top of page

मणिपूमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद

मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात सोमवारी संशयित दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात आसात रायफल्सचे दोन जवान शहीद झाले. त्यानंतर परिसरात बराच वेळ जोरदार गोळीबार झाला आणि मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबवण्यात आली. शहीद जवानांची ओळख वॉरंट ऑफिसर बलवंत सिंह आणि रायफलमन सी.एम. सिंह अशी झाली आहे अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. तातडीने वैद्यकिय उपचार मिळूनही त्यांचा मृत्यू झाला.


सुरक्षा अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांवर झालेला हा हल्ला शांगशाकजवळील नुंगशांक काँग गावाजवळ झाला. 40 आसाम रायफल्सचा ताफा आपल्या छावणीतून पोलीस ठाण्याकडे जात असताना हा हल्ला झाला. प्राथमिक तपासात संशयित दहशतवाद्यांनी मार्गावरील पुलाच्या दोन्ही बाजूंना तीन आयईडी स्फोटके पेरल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, सुरक्षा दलाच्या ताफ्यातील वाहने त्या मार्गावरुन जाताच दोन आयईडीचा स्फोट झाला. त्यानंतर अनेक आजूबाजूने जोरदार गोळीबार करण्यात आला. अधिकार्‍यांच्या मते, हा पूर्णपणे नियोजित आणि समन्वय साधून करण्यात आलेला हल्ला होता. आसाम रायफल्सच्या जवानांनी तात्काळ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जवळपासएक तास दोन्ही बाजूंने चकमक सुरू होती. त्यानंतर परिसरात सॅनिटायझेशन आणि शोधमोहिम राबविण्यात आली. यावेळी घटनास्थळावरून आणखी एक न फुटलेला आयईडी जप्त करण्यात आला.


या हल्ल्यातील जखमी जवानांना प्रथम शांगशाक येथील आसाम रायफल्सच्या छावणीत प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. आता हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलाने परिसरात मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. आधिकार्‍यांनी सांगितले की, परिसरात अद्याप तणावचे वातावरण असून तपास सुरू आहे. हल्ल्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


मणिपूरचे राज्यपाल अयज कुमार भल्ला यांनी लोकभवनामार्फत निवेदन जारी करून या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या हिंसक घटनांना समाजात कोणतेही स्थान नाही. गृहमंत्री गाविंददास कोंथौजम यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. अशा घटना हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये सामान्य परिस्थिती निर्माण करण्याच्या प्रयत्नांना धक्का देणार्‍या आहेत असं विधान त्यांनी केलं.

Comments


bottom of page