top of page

महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध लागू करण्याची मागणी महसूल संघटनेचे मंत्री बावनकुळे यांना निवदेन

नांदेड: महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध लागू करण्याच्या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटनेने आक्रमक पाऊल उचलले आहे. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या मागणीबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात सोमवारी नांदेड दौर्‍यावर आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देऊन शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली.


महसूल विभागाचा आकृतीबंध लागू करण्यासाठी ‘ दांगट समिती’ ने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. मात्र, या अहवालाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचार्‍यांची संख्या अपुरी असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे दांगट समितीने सुचवलेल्या पदांव्यतिरिक्त अतिरिक्त 25 टक्के पदवाढ करून नवीन आकृतीबंध त्वरित अमलात आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याच बरोबर नाचब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड पे 4,800 रुपये करण्यात यावा, महसूल सेवकांना ‘ चतुर्थश्रेणी ’ ड दर्जा द्यावा किंवा किमान 25 ते 30 हजार रुपये वेतन द्यावे, ग्राम महसूल अधिकार्‍यांना तांत्रिक वेतश्रेणी लागू करावी, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्‍यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करू नयेत. यासह एकून 14 प्रलंबित मागण्या संदर्भात हे निवेदन देण्यात आले.


महसूल मंत्र्यांनी कर्मचार्‍यांच्या या मागण्यांची दखल घेत, महसूल विभागाच्या अप्पर प्रधान सचिवांना या विषयावर तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. हे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार, जिल्हाध्यक्ष गिरीष येवते, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय नागमवाड, संजय वारकड, मुगाजी काकडे, स्वप्नील दिगलवार, अनिरुद्ध जोंधळे, देविदास जाधव, नामदेव धोंड, श्रीराम पांढरे, सानेटक्के, सचिन होेंडाळकर आदी उपस्थित होते.

Comments


bottom of page