top of page

महाविकास आघाडीला धक्का; काँग्रेसचा एकला चलो रे ?


लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. याच धर्तीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी आघाडी आणि युतीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही युतीचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.


महायुती किंवा महाविकास आघाडीकडून अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठीचे पत्ते उलगडण्यात आलेले नाहीत. राज्य पातळीवर प्रमुख युती आणि आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणुक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचं सांगत वेगळ्या निर्णयांची शक्यता वर्तवली आहे.


पण आता स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीला फुटीचा पहिला धक्का मराठवाड्यात बसण्याची शक्यता आहे. कारण आता धाराशिव जिल्ह्यातून मोठी अपडेट समोर येत आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.


तर धाराशिवमध्ये आता काँग्रेसनेही यावेळची स्थानिकच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा पवित्रा घेत नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे. जिल्हा काँग्रेसच्या उमरगा येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.


काँग्रेसकडून स्थानिकच्या निवडणुकांची तयारी आणि रणनीती आखण्यासाठी या जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वानं याच बैठकीत‘ एकला चलो रे ’ चे संकेत दिले आहेत. धाराशिवनंतर राज्यभरातही सोयीनुसार महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्ष मोठे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं विधान

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढायचे की आघाडीत? याचा सर्वस्वी निर्णय हा स्थानिक परिस्थिती पाहून तिथल्याच नेत्यांनी घ्यायचा आहे, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच आघाडी संदर्भात राज्य पातळीवर कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आघाडी संदर्भात कुठलाही निर्णय हा राज्य पातळीवरून होणार नाही, याचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आल्योच त्यांनी स्पष्ट केले.

Comments


bottom of page