top of page

माळेगाव यात्रेच्या लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद

Dec 24, 2025
1 min read

नांदेड:महाराष्ट्राच्या गौरवशाली लोकपरंपरेचे जतन आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पारंपरिक लोककला महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला.


       या लोककला महोत्सवात शाहिरी पोवाडा, भारुड, गोंधळ, वाघ्या-मुरळी, गण-गवळण, छकड, लोकगीते, लावणी, मिमिक्री, वाद्यसंगीत, नृत्य, पांगुळ, खंडोबा गीते, वासुदेव बासरी व कविता अशा विविध लोककलेचे बहुरंगी सादरीकरण करण्यात आले.

       बाई मी लाडाची… कैरी पाडाची…, आजकाल पाटलाचा लई रुबाब…, आबा सरकून बसा… अशा लोकप्रिय लावण्यांसह खंडोबा गीते, वेस्टर्न नृत्य व ग्रुप डान्सने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. या कार्यक्रमात रुपाली पुणेकर, तुकाराम खेडकर यांच्यासह पांडुरंग मुळे, आश्विनी शिवाणी बोरगावकर, सविताराणी पुणेकर, रघुवीर खेडकर, आनंद लोकनाट्य, शिवकन्या बडे आदी कलाकारांनी गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, लावणी व अन्य पारंपरिक कलांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.


     तमाशा मंडळातील कलाकारांनी सादर केलेल्या आज भरून चालली मंजुळा…, या रावजी… तुम्ही बसा भावजी…, पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची… या लावण्यांवर रसिक प्रेक्षक अक्षरशः थिरकले. जिवंत लोककलेचे हे बहुरंगी दर्शन पाहण्यासाठी लाखो रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. यावेळी लोकनाट्य कलावंतांचा स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशुराम कौशल्य, रमेश पवार व चंद्रकांत मेकाले यांनी केले. गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, विस्तार अधिकारी दमकोंडवार, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, एस. के. पाठक, आर. बी. टेंभुर्णे, एम. एस. म्हेत्रे, युसुफ शेख, दिनेश तेलंग आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Comments


bottom of page