top of page

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण; अंजली दमानिया, विजय कुंभार यांचे धक्कादायक खुलासे

पुणे : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात आता आणखी धक्कादायक करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची कागदपत्रे समोर आणली आहेत. या कागदपत्रांद्वारे त्यांनी व्यवहराला 2021 पासून सुरुवात झाल्याचा दावा केला.


सुरुवातीला यामध्ये अमेडिया कंपनी आणि दिग्वीजय पाटील यांचाही सहभाग नव्हता. उलट शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांनी आधीच पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी घेतल्याचा दावाही यातून करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात अजित पवारांचे तीन ओएसडी, मुद्रांक विभागाचे आयुक्त अन् गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांशीही समन्वय साधण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, “ या प्रकरणात 25 मे 2021 रोजी शीतल तेजवानी यांनी मूळ वतनदारांच्यावतीने पार्थ पवार यांच्या नावे मुखत्यारपत्र अर्थात पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी तयार केली. या कागदपत्रावरील प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही असून शेवटी फोटोही लावलेला आहे. तसंच हे कागदपत्र कायदेशीर नोटरी केलेलं आहे. अ‍ॅड. तृप्ता ठाकूर यांनी ही कागदपत्रे आपल्याला शेअर केली आहेत. अ‍ॅड. ठाकूर या दिग्वीजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्या वकील आहेत. याप्रकरणात ठाकूर आणि तेजवाणी यांची चौकशी केली जात आहे पण पार्थ पवार यांची कुठेही चौकशी होत नसल्यानं नाराज असलेल्या अ‍ॅड. ठाकूर यांनी 71 पानांची डिटेल्स पाठवले असून त्यात धक्कादायक खुलासे आहेत.


या कागदपत्रांनुसार, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्सचे आयुक्त संतोष हिंगणे यांच्यामध्ये आणि अ‍ॅड. तृप्ता ठाकूर यांच्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर झालेले चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये पार्थ पवारांच्या घराच्या पत्त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवारांचे पीए असलेल्या राम चौबे यांच्यात आणि अ‍ॅड. तृप्ता ठाकूर यांच्यामध्येही मुंढवा जमीन व्यवहाराबाबत व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चा होत होती. 4 एप्रिल 2023 पासून ही चर्चा सुरू होती. त्यामुळं अजित पवारांच्या पीएला ही बाब माहिती होती अजित पवारांना महिती नव्हती असा दावा कसा केला जाऊ शकतो? असा सवालही दमानिया यांनी केला आहे.

त्यानंतर जेव्हा हे प्रकरण आलं आणि त्यात गुन्हाही दाखल झाला तेव्हाही 10 नोव्हेंबर 2025 रोजी राम चौबे हे पुण्याच्या पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचल्याचा मेसेजही अ‍ॅड. तृप्ता ठाकूरांना करतात. यामध्ये जमीन व्यवहराच्या डिमांड नोटीसची कॉपी शेअर करण्यात आली. तसंच आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी असलेल्या वाघमारे यांचा फोन क्रमांकही चौबे आणि ठाकूर यांच्या चॅटिंगमध्ये शेअर करण्यात आला होता. तसंच अजित पवारांचे आणखी एक ओएसडी ढाकणे यांच्याशी देखील अ‍ॅड. ठाकूर यांच्याशी फोनवरून बोलणं झालं.


या कागदपत्रांसोबत अ‍ॅड. तृप्ता ठाकूर यांनी एक विशेष पत्र लिहिलं असू ते अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेला आणि बावधन पोलिस ठाण्याला पाठवण्यात आलं आहे. आमच्यापर्यंत ही माहिती येण्यापूर्वीच ती ठाकूर यांनी पेालिसांना दिल्याचं यावेळी दमानिया यांनी सागितलं. त्यामुळं या व्यवहारांबाबत तीन अधिकार्‍यांशी तसंच अजित पवारांच्या तीन ओएसडींशी उघडपणे चर्चा सुरू होती, असा दावाही दमानियांनी केला आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी बावधन पोलिस ठाण्यामध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा तसंच अजित पवारांचा राजीनामा घ्यावा अन्यथा पुण्यात यासंदर्भात पोलिसांना अर्ज देणार असल्याचं दमानिया म्हणाल्या.


म्हणजेच या व्यवहरात 2021 पासून कुलमुखत्यारपत्र हे शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये केलं गेलं तेव्हा त्यात अमेडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील यांचा सहभाग नव्हता. हे बाकीचे लोक यामध्ये नंतर आले, पण तत्पुर्वीच सगळ्या यंत्रणेची तेजवानी आणि पार्थ पवारांना साथ होती, असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे.

Comments


bottom of page