top of page

मुंबईच्या मालाडमध्ये भोंदूबाबाचा प्रताप उघड, स्थानिकांनी काढले व्हिडिओ; बकर्‍याचं काळीज, स्मशानातील राख लिंब-टाचणी...

मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रताप गाजत असतानाच आता मुंबईतही एक भोंदूबाबाविरोधात तक्रार झाली आहे. मुंबईच्या मालाड भागातील भोंदूबाबा दर गुरूवारी आणि रविवारी तो भूत उतरवणची बतावणी करत अघोरी पूजा करत आहे. जादूटोना, अघोरी पूजा यामुळे त्याच्या आजूबाजूला राहणारे स्थानिक लोक हैराण झाले. त्यामुळे या भोंदूबाबाला अटक करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आतापर्यंत त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप तो करत होता. मात्र, 4 एप्रिलला त्याने महापालिकेच्या गार्डनमध्ये शकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरवण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटो, व्हिडिओ सुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत.


भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकर्‍याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातील राख, लिंबू टाचणी, दारूची बाटली, कुंकू , सिगारेट अशा वस्ते घेतो, चार रस्ते जिथे मिळतात तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे. जादुटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये विशेषत: महिला, मुलांमध्ये घबराटीचं वातावरण होतं. मात्र एवढे प्रकार सुरू असूनही पोलिसांचं या रिदम पांचाळ नावाच्या भोंदूबाबाकउे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित केला जात आहे. भोंदूबाबाचा हा सगळा प्रकार, ह्या अघारेी विद्याचे व्हिडिओ या स्थानिकांनी दोन आठवड्यापूर्वीच पोलिसांना दिले आणि स्थानिकांनी सह्या करत यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणार विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली. कारण त्याच्या या अघोरी पूजेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वारंवार सांगूनही तो अपला हा कार्यक्रम थांबवत नसल्याने स्थनिकांना पोलिसांमध्ये धाव घ्यावी लागली. ही एकप्रकारे देवीची पूजा असल्याचं हा भोंदूबाबा त्याला या सगळ्या आरोपांवर प्रश्न विचारल्यावर सांगतो.


दरम्यान, पूजेचे साहित्य पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा या पूजेची भीती वाटेल आणि हा एक प्रकारे ब्लॅक मॅजिकचाच म्हणजे जादूटोण्याचा प्रकार आहे हे तुमच्या लळात येईल. मात्र अशा प्रकारे राजरोसपणे सुरू असताना पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सगळ्या प्रकारावर रिदम पांचाळ याने सर्व आरोप फेटाळत अशाप्रकारे कुठलाही जादूटोणा मी करत नाही, तर मी एक प्रकारे पूजा करत लोकांची सेवा करतो आणि त्यातून एक रुपयाही कमवत नाही असं तो म्हणतो. उलट त्यांचा त्रास मी दूर करतो असा दावा पांचाळ याने केला आहे.

दरम्यान मुंबई ही कधीही झोपत नाही म्हणतात. जी कधीही शांत नसते, जिथे नेहमी वर्दळ असते, अशा दाट वस्ती असलेल्या मुंबईमध्ये अशाप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी गोष्ट घडते. ही फक्त आताच घडती असं नाही तर मागील अनेक दिवसांपासून घडत आहे. त्याला अनेक सुशिक्षित लोक बळी पडतात आणि याला खतपाणी घालतात. हे एका प्रकारे दुर्दैव आहे. त्यामुळे अशा वृत्तीला त्या ठिकाणीच थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने डोळसपणे दक्ष राहू हे प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करणे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे. यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments


bottom of page