मुंबईत मनसेला खिंडार, 11 जणांचा भाजपात प्रवेश मातोश्रीचा प्रभाव असलेल्या वांद्रेतील पदाधिकार्यांचा राज ठाकरेंना जयमहाष्ट्र !
- Navnath Yewale
- Jan 2
- 1 min read

मुंबई: महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना नाराजांनी थेट बंडाचे निशान फडकवले. सत्ताकरणांसाठी गोळाबेरजेतील हातचा गायब करू पाहणार्या बंडखोरांना थंड करण्यासाठी पक्षश्रेष्टींची प्रतिष्ठा पणाला लागली, तर स्थानिक नेतृत्वाचे नाके नऊ आल्याचे दिसून आले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे कल्याण- डोंबिवली आणि मुंबई मनपा निवडणुकीत मनसे उमेदवारांनी अर्ज मागे घेत असताना दुसरीकडे मातोश्रीचा प्रभाव असलेल्या वांद्रे येथे 11 मनसे पदाधिकार्यांनी राज ठाकरेंना जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला.
मुंबईत मनसेच्या 11 पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहेत. वांद्रेतील प्रभाग 97 हा ठाकरेंच्या उमेदवाराला गेल्याने, तर प्रभाग 98 मधील मनसेचा उमेदवार मान्य नसल्याने 11 पदाधिकार्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या सर्वच प्रमुख जुन्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला आहे. भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकार्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
मनसेला खिंडार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष विजय काते, शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे, शाखा सचिव भाऊराव विश्वासराव, उपशाखा अध्यक्ष विजय कुलकर्णी, अॅड. अशोक शुक्ला, नरेंद्र कौंडीपूजला, प्रविण पाटील, रोहित गोडिया, अजय कताळे, दत्ताप्रसाद देसाई, मनसे उपविभाग अध्यक्ष आकाश आवळेकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्याचे पक्षात स्वागत केल्याची पोस्ट मंत्री आशिष शेलार यांनी एक्सवर केली.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या 53 उमेदवारांनी शिवतीर्थ निवास्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कितीही आमिषे आली तरी त्याला बळी पडू नका. मलाही अनेक ऑफर आल्या होत्या. मात्र, ऑफर देणार्यांना मी पळवून लावले होते. विजयी होण्यासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करा, असा सल्ला राज यांनी उमेदवारांना दिला. शिवतीर्थावर सर्व उमेदवारांचे शर्मिला ठाकरे यांनी औक्षण केले. यानंतर उमेदवारांना मार्गदर्शन करताना मुंबई मराठी माणसाची आहे. तिला व मराठीला वाचविण्यासाठी आपल्याकडे ही शेवटची संधी आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.



Comments