मुख्यमंत्र्यांची टीका अन् संभाजीनगरमध्ये शिवसेना (उबाठा) ची रॅली रशीद मामू ठाकरेंनी बाजू पलटवली, निवडणुकी आधीच वातावरण तापले!
- Navnath Yewale
- Dec 26, 2025
- 2 min read

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकी आधीच वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. रशीद मामुंच्या भुमिकेची यामध्ये चांगलीच भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी रशीद मामू यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत, अशा शब्दात ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये मोठी खेळी केली आहे. या खेळीमुळे संभाजीनगरच वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
खरं तर आज मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी रशीद मामू यांच्या शिवसेना प्रवेशावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला काही तास उलटल्यांनतर ठाकरे यांनी मोठी खेळी केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संभाजीनगरमध्ये प्रचाराला सुरूवात केली आहे. या प्रचाराला रशीद मामू यांनी हजेरी लावली होती.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मशाल रॅली काढली. या रॅलीला रशीद मामूने देखील हजेरी लावली. विशेष म्हणजे रशीद मामू गळ्यात भगवं उपरण परिधान करून या मशाल रॅलीत सहभागी झाले होते. त्यामुळे या मशाल रॅलीला एक वेगळे रुप आले होते. तसेच ही रॅली चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या मशाल रॅलीमुळे आता संभाजीनगरमधील वातावरण चांगलच तापण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला होता.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ठाकरे यांच्या टीका केली होती, मुख्यमंत्री म्हणाले की, मला अतिशय दु:ख आहे, की हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपूत्राने अशाप्रकारे मतांचे लांगूलचालन करण्यासाठी अशा व्यक्तीला प्रवेश दिला आहे. त्यातून त्याचे चरित्र आणि त्यांची दिशा स्पष्ट होत आहे. त्यांना आता लांगूलचालन करायचे आहे. विशिष्ट लोकायचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत.पण जनता हे बघत आहे. देशप्रेमी, देशभक्त आणि राष्ट्रवादी लोकं हे पाहत आहेत. त्यामुळे याचं नुकसान त्यांना सहन करावचं लागेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.



Comments