top of page

मुख्यरस्त्याच्या नालीवरील अतिक्रमणावर बुलडोझरव्यापारी, नागरिकांचा स्वपूर्तीने सहभाग; मुख्यरस्त्यावरील धुळीचाही बंदोबस्त होणार?

8 hours ago
1 min read

शिरुर कासार: गेल्या दशकापासून शिरुर शहरातील मुख्य रस्त्यांचा धुळीने ताबा घेतला आहे. शहरअंतर्गत जिजामाता चौक - छत्रपती संभाजीमहाराज चौक या मुख्य रस्त्यावर वाहतुकीमुळे उडणार्‍या धुळीमुळे व्यवसायीक, नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावी लागत आहे. तुर्तास खड्डे बुजवण्याचे काम प्रगती पथावर असले, वाहतुकीस अडथळा ठरणारे दुतर्फा नाल्यावरील अतिक्रमावर आज (बुधवार, दि.14) मुख्याधिकारी गणेश दहिफळे यांच्या नेतृत्वात बुलडोझर चालवण्यात आले. याच रस्त्यावरील धुळीने नागरिकांना श्वसनाच्या विविध आजाराचा त्रास सहन करावा लागत असल्याने दबक्या आवाजात ..साहेब तेवढं धुळीचाही बंदोबस्त करा.. असा आर्त टाहो फोडताना व्यवसायीक, नागरिक दिसून आले.


शिरुर कासार शहरातील रस्त्यांवर गेल्या दशकापासून धुळीने ताबा मिळवला आहे. मुख्य रस्त्यावरील खडी,डांबराचे अस्तित्व शोधूनही सापडत नाही. खड्ड्याने माखलेल्या रस्त्यावरून उडणारी धुळ व्यवसायिक, नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून रस्त्यावर अधूनमधून पाणीची फवारणी करण्यात येत होती, मात्र दुष्काळ जाहीर झाल्यामुळे पाण्याच अपव्यय टाळण्यासाठी धुळीवर मात करण्यासाठी पाणी फवारणीचा प्रयोगही बंद झाला. रस्त्याच्या दूतर्फा व्यवसायिकांसह रहदारी करणार्‍या नागरिकांच्या भावनांची दखल घेत प्रशासनाकडून मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम प्रगती पथावर आहे.


बुधवारी मुख्याधिकारी गणेश दहिफळे यांच्या नेतृत्वात दुतर्फा नाल्यांवरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवण्यात आले. लवकरच संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरणाचा लेअर देण्यासाठी वाहूकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्यात येत असून नाल्याच्या आतिल बाजूचे विजेचे खांब नालीबाहेरील बाजूस स्थलांतरीत करण्यात येणार आहे. मुख्य रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामास आडथळा ठरणार्‍या अतिक्रमणापासून कामास सुरूवात करण्यात आली आहे. लवकरच मुख्य रस्त्याच्या डांबरकोट लेअरच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गणेश दहिफळे म्हणले. त्यामुळे दशकापासून धुळीपासून त्रस्त शिरुरकरांची या जटील समस्येतून मुक्तता होणार का? हे येणार्‍या काळात पाहाणे औत्सक्याचे ठरणार आहे.

Comments


bottom of page