top of page

राहुल गांधी, प्रियंका गांधी इंडिया गेटवर, अंकिता भंडारी परिवाराच्या आंदोलनात सहभाग

2 hours ago
2 min read

नवी दिल्ली: उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिताचे आई-वडिल दिल्लीतील इंडिया गेटवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील त्यांच्या या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी इंडिया गेटवर पोहोचले.


अंकिताच्या पालकांनी सिक्कीमचे नवे राज्यपाल म्हणून दुष्यंत गौतम यांच्या नियुक्तीला तीव्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसनेही या नियुक्तीला कडाडून विरोध केला आहे. अंकिता भंडारी हत्या प्रकरणात दुष्यंत गौतम यांचे थेट नाव किंवा त्यांच्यावर सुरुवातीला आरोप नसला तरी, या संपूर्ण हत्याकांडात एका कथित व्हीआयपी व्यक्तीचा उल्लेख वारंवार झाला होता. हा कथित व्हीआयपी दुसरा तिसरा कोणी नसून दुष्यंत गौतम असल्याचा आरोप आता केला जात आहे. असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.


अंकिताच्या आईने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, 12 तारखेला जेव्हा दुष्यंत गौतम यांना राज्यपाल केल्याची बातमी आली, तेव्हा आम्हाला दु:ख झाले. त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींना अवाहन करत म्हटले आहे की, राष्ट्रपती स्वत: एक महिला आणि एक मुलीची आहे आहेत, त्यामुळे त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात. सीबीआय चौकशी पूर्ण होईपर्यंत दुष्यंत गौतम यांच्या राज्यपाल नियुक्तीला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे अंकिताचे वडील वीरेंद्र भंडारी यसांनी थेट दुष्यंत गौतम यांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली आहे. उर्मिला सनावर या महिलेने वारंवार तो व्हीआयपी दुूष्यंत गौतमच असल्याचे म्हटले असताना सीबीआय त्यांना का पाठीशी घालत आहे. असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.


दरम्यान, अंकिता भंडारी ही ऋषिकेश जवळील वनंत्रा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 18 सप्टेंबर 2022 रोजी रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य याने त्याचे दोन कर्मचारी सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांच्या साथीने अंकिताची निर्घुण हत्या केली होती, घटनेच्या चार दिवसानंतर तिचा मृतदेह चीला कालव्यातून सापडला होता. यसा प्रकरणी न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


मात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड आणि स्वत:ला पत्नी म्हणवून घेणारी अभिनेत्री उर्मिला सनावर यांच्यातील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यानंतर अंकिता हत्याकांडातील व्हीआयपी अँगल मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला. या प्रकरणी काँग्रेससह अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने केली. ज्यामध्ये अंकिताचे पालकही सहभागी झाले होते. वाढता दबाव पाहता या वर्षी जानेवारीत मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अंकिताच्या पालकांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.

Comments


bottom of page