सीजेपीचे रांका, दास, शिंदे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवर दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे आशुतोष रांका, सौरव दास आणि अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी आज पुन्हा ताब्यात घेतले. सीजेपीचे हे तिनही पदाधिकारी जंतरमंतरच्या दिशेने निघाले असताना दिल्ली पोलिसांनी ही करवाई केल्याची माहिती आहे. शनिवारी (दि.10 ऑक्टोबर) अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतलं होतं.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशुतोष रांका, सौरव दास यांच्यासह काही जण जंतर-मंतर जवळ असलेल्या जेडीयू कार्यालय भागात गेले. त्यानंतर त्यांनी गेटवरून उड्या मारल्या आणि जंतर-मंतरच्या आत गेले. ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिस एफआयआर ही दाखल करू शकतात. आशुतोष रांका आणि सीजेपीने पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात सीजेपीचे नेते जंतरमंतरला पोहोचलेले दिसत आहेत. रांका यांचे अनेक समर्थक झेंडे घेवून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणा देताना दिसत आहेत. त्यानंतर पोलिस या तरुणांची धरपकड करून व्हॅनमध्ये नेताना दिसत आहेत. दरम्यान, सरकारने आंदोलनाच्या यादीतून जंतरमंतरची जागा हटवली आहे. त्यावर सीजेपीने नाराजी व्यक्त केली आहे.
यावर अभिजीत दिपके यांनी आशुतोष रांका यांचा फोटो शेअर करून पोस्ट केली आहे. जंतरमंतरवर तिरंगा फडकवताना आशुतोष रांका असं दिपकेंनी यात म्हटलं आहे. दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी सीजेपीने आंदोलन करण्याच निर्णय जाहीर केला होता. मात्र, आंदोलनाच्या दिवशी दिल्ली पोलिसांनी विमानातून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले होते. त्याचबरोबर त्या दोन दिवसात दिल्ली पोलिसांनी 7 हजाराहून आधिक कार्यकर्त्यांना अटक केली होती. तयनंतर या सर्वांना सोडून दिलं. नेत्यांना अटक केल्यानंतर जंतरमंतरवर तरुणांनी मोठी गर्दी करत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती.
जंतरमंतरवर तिरंगा फडकवणं कधीपासून गुन्हा : अभिजीत दिकपे यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत जंतरमंतरवर तिरंगा फडकवनं हा गुन्हा आहे का, आशुतोष रांका, सौरव दास, अजिंक्य शिंदे यांच्यासह 10 ते 15 कार्यकर्त्यांनी आज जंतरमंतरवर तिरंगा फडकवला. जंतरमंतरवर तिरंगा फडकवनं ज्याच्यासाठी गुन्हा आहे तो सर्वात मोठा देशद्रोही आहे. नरेंद्र मोदी हे घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतरमंतरचं नाव हटवलं आहे. त्यांना वाटतंय की आता जंतरमंतर आंदोलनाचं स्थळ राहणार नाही. इथे आंदोलनं होणं बंद होतील. पण तसं होणार नाही असंही अभिजीत दिपके हिंगोलीत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
याशिवाय दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका, सौरव दास, अजिंक्य शिंदे यांना जफरपूर पोलिस ठाण्यात ठेवले आहे. दिल्ली पोलिस वकिलांनाही सीजेपीच्या पदाधिकार्यांना भेटू देत नाहीत, त्यांचा संपर्कही होवू देत नसल्याचा आरोप सीजेपीकडून करण्यात येत आहे.



Comments