दुष्काळी भागातील शेतकर्यांना दिवाळीसाठी 5 हजार रुपयांची मदत- मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठकीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. सुरुवातीला 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. त्यात आता आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तसंच शेतकर्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी आधी अग्रीम मदत म्हणून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्यांच्या खात्यावर 5 हजार रुपये पाठवले जाणार आहेत असंही त्यांनी सांगितलं.
दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकर्यांना मदतीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. सुरुवातीला आपण 265 तालुक्यात दुष्काळ घोषित केला होता. काही तालुक्यात तक्रारी होत्या. आता ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 चा आढावा घेऊन 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. 40 तालुके वाढले आहेत. बहुतांश महाराष्ट्र, ज्या भागात शेतकरी दुष्काळाने होरपळला होता त्या भागाला दुष्काळाच्या 12 सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधी गेल्या 25 वर्षात दुष्काळ नोव्हेंबरच्या शेवटी जाहीर होतो आणि डिसेंबरमध्ये मदत देतो. पण दुष्काळाची परिस्थिती पाहता आपण आगाऊ दुष्काळ जाहीर केला. दुष्काळाचा जीआरसुद्धा ऑक्टोबरमध्येच काढला. सप्लिमेंटरी जीआर काढला असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दुष्काळामुळे शेतकर्यांसाठी दिवाळी अडचणीची आहे. त्यामुळे मदत आणि कार्यप्रणाली जी पूर्ण करावी लागते ती दिवाळीच्या आधी होणं कठीण आहे. कायद्याने दिलेल्या तारखांमुळे दिवाळीच्या आधी पूर्ण होऊ शकत नाही. पण परिस्थिती विचारात घेता दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी एकत्रित बसून चर्चा केली. पुढच्या काळात शेतकर्यांना जी मदत करायची आहे ती करू, पण त्यात अग्रीम म्हणून 5 हजार रुपये शेतकर्यांच्या खात्यात दिवाळीआधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळी आधी बळीराजाच्या हातात काही पैसे असावेत यासाठी निर्णय घेतला असल्याचं सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे पैसे दिवाळीआधी खात्यात गेले पाहिजेत असा प्रयत्न असणार आहे. याशिवाय कर्जमाफीचे काम सुरू आहे. आता नव्याने साडे तीन लाख शेतकर्यांची यादी अधिकृत केली आहे. त्याचेही पैसे जाणं सुरू होईल. पण आता शेतकर्यांना तातडीने दिवाळीआधी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.



Comments