राजीनाम्यानंतर प्रशांत जगतापांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चाजगताप मुंबईकडे रवाना; काँग्रेसभवन येथे पक्षप्रवेश होणार?
- Navnath Yewale
- Dec 25, 2025
- 2 min read

पुणे : दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर नाराज झालेल्यामाजी महापौर तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला आहे . हा राजीनामा सोपवताना प्रशांत जगताप यांनी आपण यंदा महापालिका निवडणुका लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच कोणता राजकीय पर्याृयी निवडायचा याबाबत देखील आपण लवकरच कळवणार असल्याचा देखील सांगितलं होतं.
त्यानंतर गुरूवारी प्रशांत जगताप हे वेगळा राजकीय निर्णय घेणार असल्याचं सागितलं जात आहे. यापूर्वी त्यांनी आपली नाराजी पक्षापर्यंत पोहोचवल्यानंतर प्रशांत जगताप यांना विविध पक्षातून आपल्याकडे येण्यासाठी फोन कॉल आले होते असे देखील प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रशांत जगताप यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकउून देखील संपर्क साधण्यात आला असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच त्यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील आपल्याकडे येण्यासाठी ऑफर दिली असल्याचं जगताप म्हणाले. या दोन्ही शिवसेनेसोबतच्या चर्चेबरोबरच प्रशांत जगताप यांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. त्यानुसार प्रशांत जगताप यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
दरम्यान, पुण्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक मुंबईमध्ये संपन्न होत आहे. महाविकास आघाडी सोबत चालेल्या चर्चा आणि जागा वाटपाच्या फॉर्मुल्याबाबत अंतिम चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेसाठी सर्व स्थानिक वरिष्ठ नेते मुंबई दाखल झाले आहेत. या नेत्यांसोबतच पुण्याचे प्रभारी सतेज पाटील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार हे नेतेही मुंबईतील काँग्रेस भवनमध्ये उपस्थित होते.
एकीकडे काँग्रेसची पुणे महापालिकेबाबत महत्वाची बैठक सुरू असतानाच प्रशांत जगताप हे पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले असल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत जगताप मुंबईतील काँग्रेस भवनमध्ये जाऊन यासर्व वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्या असल्याच्या वृत्ताला काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे उक्त सर्व नेत्यांची उपस्थिती, पुणे महापालिकेची आजची बैठक आणि त्यातच प्रशांत जगताप हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याने आज त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणार्या काँग्रेस योग्य पर्याय असल्याचे त्यांचे मत आहे.



Comments