राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार!
- Navnath Yewale
- Sep 24
- 1 min read
निवडणूक अयोगाकडून मतदार याद्यांचे वेळापत्रक जाहिर

सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका 30 जानेवारीच्या आता घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आयोगाला मुदतवाढ दिली जाणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता राज्यातील 32 जिल्हापरिषदां आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिलं मोठं पाऊल टाकलं आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. आयोगाने यापूर्वीच या निवडणुकीसाठी विधानसभेची मतदारयादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी लागू असेल, असे स्पष्ट केले आहे विधानसभेची मतदारयादी जशीच्या तशी संबंधित प्रभागांमध्ये विभागली जाणार आहे.
आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे आता याच मतदारयादीवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचन गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहिर केली जाणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी हरकती व सूचना मागविल्या असल्याने राज्यात महापालिका निवडणूका त्यानंतर होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतरच महापालिकेच्या निवडणुकांचा धुराळा उडेल. त्यासाठी जानेवारी महिना उजडणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्यात होऊ शकतात. याच कालावधीत महापालिका निवडणुकांसाठी मतदारयादीवर हरकती व सूचना मागवल्या जाऊ शकतात. तसेच निवडणुकांचे वेळापत्रकही याचदरम्यान जाहीर होऊ शकते.


Comments