top of page

राष्ट्रवादीत ‘सुनेत्रा’ पर्वाला सुरूवात, सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड सगळ्या चर्चांना पूर्णविराम; प्रफुल्ल पटेलांचा रोहित पवारांवर पलटवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांंची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. सुनेता पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भरारी येईल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.


प्रफुल्ल पटेल यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व गुणांचं तोंड भरुन कौतुक केलं. नेतृत्व कंस असावं याचं उत्तम उदाहरण अजित पवार यांनी समोर ठेवलं. व्यक्ती पदानं नव्हे, तमर कर्तृत्वानं महान होते. दादा सर्वार्थानं दादा होते,ते कधीही खचले नाहीत. पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी अजितदादांच्या मनात तळमळ होती. अशा शब्दांत पटेल यांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. अजित पवारांमुळे राष्ट्रवादीला वैभवाचे दिवस आले, असं पटेल म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस श.प.चे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. सध्या काही जण आम्हला पक्ष कसा चालवायचा, याचे सल्ले देत आहेत. ज्यांचं आमच्या पक्षाशी काही देणंघेणं नाही, ते आम्हाला उपदेश करत आहेत. महिन्याभरात तुम्ही पाहिलंच असेल, काही जण इकडे तिकडे फिरत आहेत. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक, अशी परिस्थिती आहे, असं म्हणत पटेलांनी रोहित पवारांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झालं. मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. त्याच्या निधनानंतर तीन दिवसांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाणार याबद्दलची चर्चा सुरू होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.


सुनेत्रा पवार यांनी 2024 मध्ये बारामतीमधून लोकसभेची निवडणुक लढवली. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर याच वर्षी सुनेत्रा पवारयांची राज्यसभेवर वर्णी लागली. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रं हाती घेतली . आता पक्षाची धुरादेखील त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. लवकरच त्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देतील आणि बारामतीमधून विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील. निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.

Comments


bottom of page