वनसंपदेच्या संवर्धनासाठी तलाठी कार्यालयासमोर अन्नत्याग!
- Navnath Yewale
- 14 hours ago
- 1 min read
आंदोलना चौथा दिवस; पदाचा गैरवापर करून उपाय योजनांचा विसर पडलेल्या वनकर्मचार्यावर कारवाईची मागणी

बीड : तालुक्यातील वनअधिनियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. अवैध वृक्षतोड, अवैध लाकूड वाहतूक करण्यात येत असून राखीव वनक्षेत्रात अतिक्रमणाला वनविभागाच्या कर्मचार्यांकडूनच खतपाणी घालण्यात येत आहे. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर करणार्या वनरक्षकावर कारवाईच्या मागणीसाठी अशोक जायभाय यांनी गोमळवाडा येथील तलाठी कार्यालयासमोर दि. 2 डिसेंबर पासून उपोषण सुरू केले आहे.
तालुक्यातील राखीव वनक्षेत्र अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे. वनअधिनियमांतर्गत एकूण क्षेत्राच्या किमान 32 टक्के वनक्षेत्र अनिवार्य असले तरी तालुक्यात वनक्षेत्रावर वाढते अतिक्रमण वनसंपदेच्या मुळावर उठले यास वनविभागाचे शिरुर का.वनरक्षक जबाबदार आहेत. निष्क्रिय वनरक्षकाच्या संगनमताने तालुक्यात सर्रास अवैध वृक्षतोड, लाकूड वाहतूक करण्यात येत आहे. वनक्षेत्रात कुर्हाडबंदी, चराईबंदीचा बोजवारा उडाल्याने वनांचा र्हास होत चालला आहे.
अवैध लाकुड वाहतूकदार, अवैध वृक्षतोड, अतिक्रमणधारकांकडून हात ओले करून उपाय योजनांना तिलांजली देणार्या जबाबदार वनरक्षकावार कठोर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार अशोक जायभाय यांनी गोमळवाडा (ता.शिरुर कासार) तलाठी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. दरम्यान यापूर्वी साधारण दोन महिन्यापूर्वीही याच मागण्यांसाठी अशोक जायभाय तलाठी कार्यालयासमोर उपोषणास बसले असता तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. काळे यांनी जबाब पद्धतीने एका महिन्यात कारवाईचे लेखी अश्वासन दिले होते. मात्र, अश्वासानानुसार कारवाई दिरंगाईचा आरोप करत दि.2 डिसेंबर पासून गोमळवाडा तलाठी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकार्यांच्या लेखी अश्वासनावर ठाम असलेल्या अशोक जायभाय यांचा आज आंदोलनाचा चौथा दिवस असला तरी अद्याप जबाबदार प्रशासानचे जिल्हास्तरीय अधिकारी आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत.



Comments