top of page

वाळू उपसा चालू ठेवण्यासाठी मागितली 6 लाख 40 हजारांची लाच अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात; बीडमध्ये आंमलदार चतुर्भूज

जालना : मराठवाड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यवा कारवाईने सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांना धडकी भरली आहे. जालना-बीडमध्ये एकाच दिवशी कारवाई करत एसीबीने एक पोलिस अन दुसर्‍या कारवाईत थेट तहसीलदारस अटक केली आहे. या दोन धडक कारवायांमुळे प्रशासनाला धडकी भरली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना एका प्रकरणात 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीडच्यसा पथकाने अटक केल्याने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.


जालना लाचलुचपत विभागाने बीडमध्ये कारवाई केल्यानंतर बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील राहत्या घरी सापळा रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


अंबड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी पोकलेन व ट्रक सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एसीबीने लाचेची रक्कम तब्बल 6 लाख 40 हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण जेरबंद केले आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


दहा हजारांची लाच घेताना अंमलदार अडकला: बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्यामधील अंमलदार दत्तात्रय बळवंत याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अपघातामध्ये मयत झालेल्या वडिलांच्यवा विम्याच्या दाव्यासाठी कागदपत्र देण्यासाठी बळवंत याने पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर दहा हजार रुपये स्वीकारताना या पोलीस अंमलदारास जालना अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याच वादग्रस्त दत्तात्रय बळवंत याने एका शेतकर्‍याच्या मुलाला ‘ तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन’ अशी धमकी काही दिवसापूर्वी दिली होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments


bottom of page