top of page

विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या अडचणी वाढल्या, संजय राऊतांकडून व्हिडिओ व्हायरल.

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप- शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना- मनसेमध्ये थेट लढत होत आहे. त्यासाठी या पक्षांमध्ये नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खासदार संजय राऊत, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नार्वेकर यांनी उमेदवारांना धमक्या दिल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.


संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओच सोशल मिडियात पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये नार्वेकर आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यातील वाद समोर आला आहे. या वादादरम्यान नार्वेकर यांनी थेट मुंबईच्या जॉईंट सीपींना फोन करून राठोड यांना देण्यात आलेली सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिल्याचे दिसते. ह्यांची सुरक्षा आताच्या आता काढा, हा विधनसभा अध्यक्षांचा आदेश आहे. असे नार्वेकरांनी म्हटल्योच व्हिडिआमध्ये दिसत आहे.

दरम्यान, हरिभाऊ राठोड यांनी मिडियाशी बोलताना नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते.


नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. याच भागातील तीन प्रभागांमध्ये त्यांचे नातेवाईक महापालिका निवडणुकीत उतरले आहेत. नार्वेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पाच वाजेपर्यंत तिथे होते. मला तिथेच धमकी देण्यात आली. माझी सुरक्षा काढण्याची, सुविधा काढून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. नार्वेकरांनी तिथून पोलिसांना फोन लावून सुरक्षा देण्यासाठी तुमचे काय निकष आहेत, अशी विचारणा करत आपली सुरक्षा काढण्याचे आदेश दिल्याचा दावा राठोड यांनी केला होता. याच संभाषणाचा व्हिडीओ राऊत यांनी सोशल मिडियात पोस्ट केला आहे.


राठोड म्हणाले की, नार्वेकर यांना आपण तुम्ही विधानसभा अध्यक्ष आहात, तुम्हाला हे शोभत नाही, अशी विचारणा केली होती. त्यानंतर त्यांनी माझ्या सर्व सुविधा काढून घेण्याची धमकी दिल्याचा दावा राठोड यांनी केला. दरम्यान, राठोड यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दबावामुळे विरोधी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत, असा आरोप करणारी तक्रार पालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. त्यानुसार आयोगाचे पालिका आयुक्ताकडे अहवाल मागविला आहे. नार्वेकरांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Comments


bottom of page