top of page

...शंभर वेळा विचार करेल आणि त्याचा आत्मा थरथरेल .. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे एनआयए कडून चार्जशीट दाखल; हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शुभम द्विवेदीच्या पत्नी ऐशान्याकडून सरकार, तपास यंत्रणेचे आभार


पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूर येथील मृत्यू झालेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) चार्जशीट दाखल केल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. आणि आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलं की, भारत सरकार आणि एनआयए ने या प्रकरणात अत्यंत जलद गतीने कारवाई केली आहे, यासाठी त्या सर्व संबंधित अधिकारी आणि सशस्त्र दलांचे धन्यवाद.


ऐशान्या द्विवेदी म्हणाल्या की, “ पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी वेळेवर पूर्ण करून चार्जशीट दाखल करणं, हे पिडित कुटुंबांसाठी खूप मोठा दिलासा आहे. पहलगामच्या घटनेनंतर सरकारने सातत्याने कारवाई केली. भारत सरकार आणि एनआयए चे खूप- खूप धन्यवाद की या प्रकरणात लवकर चार्जशीट दाखल झाली. आपण ताबडतोब कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव चालवून दहशतवाद्यांना कठोर संदेश दिला. आता तपास प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या तपासामध्ये सामील असलेल्या सर्व अधिकारी आणि सशस्त्र दलांचे मी आभार मानते.”


चार्जशीटमध्ये अशा लोकांची नावे समोर आल्यावरही त्यांंनी प्रतिक्रिया दिली, जे भारतीय असूनही दहशतवाद्यांना मदत करत होते. ऐशान्या म्हणाल्या की, अशा लोकांविरुद्ध कठोरात- कठोर कारवाई व्हायला हवी. ऐशान्या यांनी मागणी केली की, आरोपींना अशी शिक्षा मिळावी की, भविष्यात कोणताही भारतीय पाकिस्तान-समर्थित दहशतवाद्यांना मदत करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल आणि त्याचा आत्मा थरथरेल.


दरम्यान, एनआयए च्या चार्जशीटमध्ये अशा लोकांची नावे आहेत, ज्यांच्यावर 10 लाख रुपयांपर्यंत बक्षीस होतं. आता देशाने अशा प्रकरणांमध्ये शांत बसू नये, तर दहशतवादाविरुद्ध पूर्ण ताकदीने लढाई लढायला हवी. अशा प्रकरणांमध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा असंही म्हटलं आहे. ऐशान्या यांनी चिंता व्यक्त करताना सांगितलं की, पहलगाम हल्ल्यानंतर लाल किल्ल्याची घटना आणि नुकताच सिडनीत झालेला हल्ला देखील दहशतवादाचीच साखळी आहेत, जे दर्शवतात की, दहशतवादी कारवाया सतत वाढत आहेत. त्यांनी देशवासियांना एकत्र येण्याचे अवाहन केलं आणि म्हटलं की, दहशतवादाविरुद्धची लाढाई केवळ सरकार किंवा तपास यंत्रणांची नाही, तर संपूर्ण देशाची आहे. यांच्याविरुद्ध संपूर्ण देशाला एकतूट व्हावं लागेल, तेव्हाच दहशतवाद समूळ नष्ट करता येईल.

Comments


bottom of page