top of page

शिवजन्मोत्सव : भगव्या लाटेत न्हाऊन निघाली शिवजन्मभूमी

शिवरायांना अभिवादनासाठी लाखो शिवप्रेमींची शिवनेरीवर गर्दी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवनेरीवर दाखल


किल्ले शिवनेरीवर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 396 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संपूर्ण शिवनेरी परिसर विद्यूत रोषणाईने उजळून निघाला असून भगव्या रंगात न्हाऊन निघालेले हे शिवभूमीचे दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ च्या घोषणांनी गड दुमदुमला असून भक्ती, उत्साह आणि अभिमानाचा संगम झाल्याचे चित्र शिवनेरीवर पाहायला मिळत आहे.

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशभरातून शिवभक्त शिवनेरीवर दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शिवभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादानासाठी दाखल झाले आहेत. तसेच राज्यभरातील गावागावामधून शिवभक्त सायकल रॅलीसह पायी चालत शिवज्योत घेऊन किल्ले शिवनेरीवर पोहोचले आहेत. ‘ हर हर महादेव!, छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभरातून शिवज्योती किल्ले शिवनेरीवर दाखल होत आहेत. या सोहळ्यापासून ऊर्जा मिळत असल्याची भावना तरुणाई व्यक्त करत आहे.


अलोटगर्दीमुळे मध्यरात्री चेंगराचेंगरीची स्थिती: शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास अंबरखाना परिसरातील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा यांच्या दरम्यान असलेल्या एका अरुंद दरवाजात गर्दी अवाक्याबाहेर झाली. शिवभक्तांचा ओघ वाढला होता. जागा अरुंद असल्याने आणि लोकांची संख्या प्रमाणाबाहेर गेल्याने एकमेकांना ढकलाढकली सुरू झाली अन् चेंगराचेंगरीची स्थिती झाली. गर्दीच्या ठिकाणी पोलिस प्रशासन किंवा प्रशासन अनुपस्थित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


या दुर्घटनेत जखमी झालेल्या शिवभक्तांना तातडीने किल्ल्याखाली आणण्यात आले. तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर जुन्नर आणि मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र काही जणांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

Comments


bottom of page