संजय गायकवाडांना दिवंगत कॉम्रेड गाविंद पानसरेंच्या सुनेनं झाप झाप झापले; शिवरायाचा नक्की कोणता वारसा पुढे नेत आहात?
- Navnath Yewale
- 16 hours ago
- 2 min read

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहलेल्या ‘शिवाजी कोण होता’ , या पुस्ताकाच्या शीर्षकावरून अनेकदा वाद झाले आहेत. पण आता एकनाथ शिंदे यांच्या शिवेसनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तब्बल 37 वर्षांनंतर यावरून वाद निर्माण केला आहे.
संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत अंबी यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच दिवंगत गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरले. यावरून आता कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
दरम्यान, संजय गायकवाड यांनी वापरलेल्या शिवराळ भाषेचा निषेध करताना पानसरे यांची सून मेधा पानसरे यांनी तीव्र शब्दात सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी, पानसरे यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचले असून त्यांचे विचार तुम्हाला मारता येणार नाहीत. तर त्यांच्या विचारांना प्रतिवाद करण्यासाठी तुमच्याकडे तुल्यबळ विचारच नाही, त्यामुळेच असे शब्द वापरत आहात असे खडे बोल सुनावले आहेत.
आमदार संजय गायकवाड यांनी, पुस्ताकचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवराळ भाषेत धमकावले. ते म्हणाले, अरे छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीत शिवाजी म्हणणारा हा गोविंद पानसरे कोण? तुमच्यासारखे नालायक लोक शिवाजी महाराजांना एकेरी भाषेत बोलतात. तुला माहितीये ना, त्या गोविंद पानसरेंचं काय झालं? त्याची अवस्था काय झाली? तुलाही घरात घुसून मी मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन.
यावरून आता नव्या वादाला तोंड फुटले असून कोल्हापुरसह राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मेधा पानसरे यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. गायकवाड यांनी पानसरे यांच्याबाबत ज्या पद्धतीने भाषा वापरली, त्याचा तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरीब रयतेचे राजे होते. पण गायकवाड त्यांचा वारसा सांगत आणि नाव घेत अशी भाषा वापरत आहेत. यामुळे ते नक्की शिवारायांचा कोणता वारसा पुढे नेत आहेत? असा सवाल मेधा पानसरे यांनी उपस्थित केला आहे.
तसेच हा गोविंद पानसरे कोण? असे म्हणणार्या गायकवाड यांना फटकारत, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे‘ शिवाजी कोण होता’ हे पुस्तक राज्याच्या कानाकोपर्यात वाचले जात आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती छापल्यागेल्या असून त्या वाटल्या गेल्या आहेत. यामुळे कॉम्रेड पानसरे यांनी जो विचार सांगितला, तो मारता येत नाही. त्याला विरोध करणारा तसा तुल्यबळ विचार तुमच्याकडे नाही, असे म्हटलं आहे.
संजय गायकवाड यांनी हे पुस्तक वाचावं, केवळ पुस्तकाचे शीर्षक बघून असे वक्तव्य करू नये. हे पुस्तक त्यांनी वाचावे असे आवाहन करत असल्याचेही मेधा पानसरे यांनी म्हटले. तसेच त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वकिलांचा सल्ला घेत असल्याचेही म्हटलं आहे. तसे झाल्यास शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढू शकतात.



Comments