top of page

शिवसेनच्या मंत्र्याची मंत्रिमंडळ बैठकीला दांडी! ऐन निवडणुकीत महायुतीला हादरे; नाराजी नसल्याचा बावनकुळेंचा दावा


मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षात इनकमिंग सुरू झाली आहे. महायुतीतही फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्ष काही ठिकाणी वेगवेगळे लढताना दिसत आहेत. काही ठिकाणी शिंदे गटातील बाहुबली नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे गटाचे प्रमुख नेते नाराज झाल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या तोंडावरील या नाराजीनाट्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटल्याचेही पाहायला मिळत आहे.


फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीतच नाराजीनाट्य सुरु झाल्याची माहिती आहे. पक्षप्रवेशामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणां विरोधात शिवसेनेत प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आम्हाला जर अधिकार, निधी वाटप, अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील बैठकीला येऊन उपायोग काय असा प्रश्न शिंदेच्या मंत्र्यांनी उपस्थित केल्याची माहिती आहे.


नाराजीनाट्यादरम्यान शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्काराचं ठरलं होतं. या बैठकीत मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे मी कॅबिनेट बैठकीला जातो असं म्हणून शिंदे बैठकीला हजर राहिले. भाजपची वाटचाल ही स्वबळावर जायची आहे. ते त्याच पद्धतीने वागत आहेत अशी भूमिका शिवसेना मंत्र्यांची असल्याची माहिती आहे.

त्यातच आता शिवसेनच्या माजी मंत्र्याने युतीतून बाहेर पडण्याचं विधान केलं आहे.


शहाजीबापू पाटलांची खदखद:

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवर अनेक माजी नगरसेवक पदाधिाकरी भाजपात जात आहेत. शिवसेनेच्याही अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच शिंदेंचे आमदार, मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. हीच अस्वस्थता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली आहे. एखाद्या अबलेवर केलेला अत्याचा असावा, अशा पद्धतीचं भाजपाचं वागणं दिसत आहे. महाराष्ट्रात असं राजकारण होणार असेल तर महाराष्ट्राची वैभवशाली राजकारणाची परंपरा थोड्याच दिवसात उद्ध्वस्त झाल्याचे तुम्हाला दिसेल, अशी खदखद शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केली. सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीत घडत असलेल्या घडामोडी आणि पक्षांतर यावर बोलताना शहाजीबापू पाटील यांनी या भावना व्यक्त केल्या.


काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची टीका : शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना, त्यांचे दु:ख हे मनाजून आलेले आहे. आता त्यांची कळ ही किती भारी आहे, हे शिंदे सेनेला भविष्यात दिसेल. जेव्हा दु:खाची ही कळ असह्य होईल, तेव्हा त्याच्या उपचारासाठी त्यांना महायुतीतून बाहेर पडावे लागेल. त्यांना महायुतीतून बाहेर पडण्याचा उपचार करावा लागेल. किंवा मरावे लागेल. हे दोनच पर्याय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.


नाराजी नसल्याचा दावा: दरम्यान, आमच्यात कोणतीही नाराजी नाही. कोणतीही अडचण आली की आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच जाणार, असे म्हणत सर्वकाही आलबेल असल्याचे शिंदे यांच्या पक्षाच्या मंत्र्याने सांगितले आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील महायुतीत कोणतीही नाराजी नाही, असे स्पष्ट केले आहे. असे असले तरी महायुतीत काहीतरी घडत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments


bottom of page