शिवालये गजबजली; ‘ओम नम: शिवाय’च्या जयघोषात वैद्यनाथनगरी दुमदुमली, महाशिवरात्रीच्या परवणीचा भाविकांनी घेतला लाभ
- Navnath Yewale
- 2 days ago
- 1 min read

परळी वैद्यनाथ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वकाळात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे भाविकांची विक्रमी गर्दी उसळली. 14 तारखेच्या मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागण्यास सुरुवात झाली होती.“ हर हर महादेव” आणि प्रभू वैद्यनाथ महाराज की जय ” अशा जयघोषांनी संपूर्ण मंदिर परिसरप दुमदुमून गेला.
देशाच्या कानाकोपर्यातून तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून लाखो शिवभक्त परळीत दाखल झाले. मध्यरात्रीपासून सायंकाळपर्यंत सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. देशातील बारा ज्योर्लिंगापैकी एक असलेल्या या पवित्र स्थळाला महाशिवरात्री निमित्त अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
दर्शन व्यवस्थेसाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा तसेच पासधारकांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांची रांग मंदिरापासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत पोहोचली हाती. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, रंगरंगोटी आणि पुष्पसजावट करण्यात आली होती. पायर्यांवर बॅरिकेट्स व मंडपांत उभारणी करून सुरक्षित आणि सुरळीत दर्शनाची सोय करण्यात आली.
वैद्यनाथ देवस्थात आणि पोलीस प्रशासनाने उत्तम नियोजनासह कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरातील विविध सामाजिक संघटनांनी भाविकांसाठी उपवासाच्या फराळाची, पिण्याच्या पाण्याची तसेच खिचडीचे मोफत वाटपाची व्यवस्था केली. परळी शहरात सर्वत्र उत्सवी वातावरण पहायला मिळाले. मंदिराचे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, मध्यरात्रीपासून आजपर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी बीड जिल्ह्याधिकार्यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगावर पारंपारिक पद्धतीने विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला. पंचम ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणार्या या देवस्थानात दरवर्षी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
15 ते 17 फेब्रूवारीदरम्यान पारंपारिक धार्मिक विधी आणि उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून,भाविकांच्या उपस्थितीमुळे परळी नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.



Comments