संघाला संपवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा- प्रधानमंत्री मोदी
- Navnath Yewale
- Oct 1
- 2 min read

स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा संघाला संपवण्याचे, चिरडण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा राहिला. प्रत्येक स्वयंसेवकाने नेहमी समाजासाठी काम केले, अशा भावना पंंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पीएम मोदी पुढे बोलताना म्हणाले की, संघाच्या या प्रवासात अनेकदा हल्ले झाले, संघाला मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्यासाठी षडयंत्रे झाली. स्वतंत्रतेनंतर संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले. परमपूज्य गुरुजींना (गोलवलकर गुरुजी) खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये टाकण्यात आले . पण जेव्हा ते जेलमधून बाहेर आले, तेव्हा त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण दिले. कधी कधी जीभ दातांखाली येते, दाबली जाते,चिरडली जाते. पण आपण दात मोडत नाही, कारण दातही आपलेच आहेत आणि जीभही आपलीच आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या औचित्याने संघाच्या प्रवासाचा आढावा घेताना ‘ राष्ट्रनिर्माणाचा महान उद्देश आणि व्यक्तिनिर्माणाचा स्पष्ट मार्ग’ हा संघाच्या कार्याचा केंद्रबिंदू ठरल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. शाखा ही साधी, सोपी आणि जीवन्त कार्यपद्धती संघाच्या शंभर वर्षाच्या प्रवासाचा पाया मानला गेला आहे. संघाच्या स्थापनेपासूनच एकच भाव ठाम राहिला आणि तो म्हणजे “ राष्ट्र प्रथम” आणि एकच ध्येय नजरेसमोर ठेवले आहे, ते म्हणजे “ एक भारत , श्रेष्ठ भारत ”
दरम्यान पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, प्रत्येक स्वयंसेवकाने अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. संघाच्या विचारधारेनुसार कोणताही हिंदू लहान किंवा मोठा नाही. प्रत्येक आपत्तीत स्वयंसेवक मदतीसाठी धावून गेले. कोरोना काळातही स्वयंसेवक देशवासीयांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. संघाने ‘ एक विहीर, एक मंदिर आणि एक स्मशान’ ही संकल्पना मांडली. आजही प्रत्येक स्वयंसेवक भेदभावविरुद्ध लढत आहे.
आज महानवमी आहे. उद्या विजयदशमी महापर्व आहे. हा दिवस अन्यायावर न्यायाचा, असत्यावर सत्याचा आणि अंध:कारवर प्रकाशाचा विजय दर्शवतो. हाच भारतीय संस्कृतीचा संदेश आहे. अशा पवित्र विजयादशमीच्या काळात 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, हा योगायोग नव्हता. ही आपल्या राष्ट्रचेतनेची पुन:प्रकट झालेली परंपरा होती. आज आपल्या पिढीला संघाचे शताब्दी वर्ष पाहण्याचे भाग्य लाभले आहे. मी या प्रसंगी देशसेवासाठी समर्पित लाखो स्वयंसेवकांना शुभेच्छा देतो आणि संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो, असेही पीएम मोदी म्हणाले.
‘ भारताच्या विभाजनाच्या वेदनेत लाखो कुटुंबे बेघर झाली होती. त्या वेळी स्वयंसेवकांनी शरणार्थ्यांची नि:स्वार्थ सेवा केली. संविधानिक संस्थांबद्दलची अस्था आणि समाजाशी असलेली आत्मीयता यांनी प्रत्येक स्वयंसेवकाला स्थितप्रज्ञ आणि संवेदनशील ठेवले. संघाबद्दल म्हटले जाते की, येथे समान्य माणसे एकत्र येऊन असामान्य आणि अभूतपूर्व कार्य करतात. ही व्यक्तिनिर्मितीची सुंदर प्रक्रिया आजही संघाच्या शाखांमध्ये पाहायला मिळते. संघ शाखेचे मैदान ही अशी प्रेरणाभूमी आहे, जिथे स्वयंसेवकाचा प्रवास ‘अहं’ पासून ‘वयं’ पर्यंत होतो. शाखा म्हणजे व्यक्तिनिर्माणाची यज्ञवेदी असून, तीच संघाच्या शतकभराच्या कार्याची खरी ओळख असल्याचंही मोदी म्हणाले.
टपाल तिकिट आणि नाणे जारी
दरम्यान, संघाच्या 100 वर्षाच्या गौरवमयी प्रवासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने विशेष टापल तिकिट आणि 100 रुपयांचे स्मृती नाणे जारी केले. या नाण्यावर एका बाजूला भारताचे राष्ट्रीय चिन्ह असून दुसर्या बाजूला सिंहासह वरदमुद्रेतील भारतमातेची प्रतिमा आहे.



Comments