संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी: आरोपींना महत्वाचे डिजिटल पुरावे, पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्यावेत - कोर्टाचे आदेश
- Navnath Yewale
- 22 hours ago
- 2 min read

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या बहुचर्चित प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्याकांडा प्रकरणी गुरूवारी (दि.8 जानेवारी) बीड येथील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये पुराव्यांची देवाणघेवाण, आरोपींचे अर्ज आणि तांत्रिक कागदपत्रांवरून जोरदार खडाजंगीचा युक्तीवाद पाहायला मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
या प्रकरणातील महत्वाचे डिजिटल पुरावे असलेले पेन ड्राईव्ह सर्व आरेापींना उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. पुराव्यांच्या पारदर्शकतेसाठी ही मागणी आरोपी पक्षाकडून करण्यात आली होती. त्यावर कोर्टाने आरोपींना पेन ड्राईव्ह देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर लॅपटॉपची क्लोन कॉपी आणि तपासी अधिकार्यांचे म्हणणे आरोपी पक्षाने पुराव्याचा भाग म्हणून लॅपटॉपची ‘ क्लोन कॉपी’ मिळावी अशी मागणी कोर्टासमोर केली.
यावर तपासी अधिकारी आणि सरकारी पक्षाने आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला असून, येत्या 15 कार्यालयीन दिवसांत यावर लेखी उत्तर सादर करण्याचे अश्वासन दिले आहे. या खटल्यातील काही आरोपींनी आपले वकील बदलण्याची मागणी केली आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपले लेखी म्हणणे सादर करावे, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याने आपले कारागृह बदलून मिळावे, यासाठी कोर्टाकडे अर्ज केला आहे. त्याच्या वकिलामार्फतही यांसदर्भात विनंती करण्यात आली असून, सुरक्षेचय किंवा इतर कारणास्तव हा बदल मागितल्याचे समजते.
सरकारी पक्षाकडून पुराव्यांची यादी सादर: आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाने कलम 330 नुसार कागदपत्रांवर आधारित पुराव्यांची सविस्तर यादी कोर्टासमोर सादर केली. या पुरव्यांच्या यादीवर आता आरोपी पक्षाला आपले म्हणणे मांडायचे असून, कोर्टाने त्यांना तशा सूचना दिल्या आहेत.
9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग (ता. केज) चे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील वाल्मिक कराडसह अनेक आरोपी अटकेत आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. तांत्रिक पुरावे आणि डिजिटल डेटा खटल्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.



Comments