संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्राम; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा तडखाफडकी माघार !
- Navnath Yewale
- Dec 29, 2025
- 2 min read

छ. संभाजीनगर : महापालिका रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीमध्ये मोठी ठिणगी पडली आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या असंतोषामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी थेट निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जंजाळ यांनी घेतलेला हा पवित्रा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सोमवारी दुपारी शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला जिल्हाप्रमुख शारदा घुले यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आल्याचे समजताच त्यांनी आपल्या समर्थकांसह कार्यालयातच ठिय्या दिला. “ जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत इथून हलणार नाही,” असा आक्रमक पवित्रा महिला पदाधिकार्यांनी घेतला. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
कार्यकर्त्यांची नाराजी आणि जागावाटपाचा घोळ पाहून राजेंद्र जंजाळ यांनी स्वत: माघार घेण्याची घोषणा केली ते म्हणाले की, ज्या 8 ते 8 जागांवर शिवसेना हमखास निवडून येऊ शकते, अशा जागाच आम्हाला मिळणार नसल्याचे समजते. जर जिल्हा प्रमुख म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल, तर निवडणुकीत उभे राहण्यात काय अर्थ आहे? माझ्याऐवजी एखाद्या सक्षम आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळावी, म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर युतीबाबत महत्वाची बैठक सुरू असताना जंजाळ यांनी बैठकीकडे पाठ फिरवून आपला निषेध नोंदवला.
जिल्हाप्रमुखांच्या पावित्र्याला आमदार प्रदिप जैस्वाल यांनीही पाठिंबा दर्शवल आहे. भाजपवर निशाणा साधताना जैस्वाल आक्रमक झाले. ते म्हणाले, “ ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणुकीत घराघरांत जाऊन पोलचिट वाटल्या त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते सहन करणार नाही. जर भाजप अशा पद्धतीने आमच्या जागा हिसकावून अन्याय करणार असेल, तर मग युती तोडलेलीच बरी असंही जैस्वाल म्हणाले.
या संपूर्ण वादाचा केंद्रस्थानी पालकमंत्री संजय शिरसाट आहेत. कार्यकर्त्यांच्या मते, जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेची बाजू कमकुवत पडल्याने आणि भाजपला हव्या तशा जागा सोडल्या गेल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. जंजाळ थेट बैठकीवर बहिष्कार टाकल्याने शिरसाट यांच्या नेतृत्वावरच स्वपक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाप्रमुखांनी घेतलेली माघार आणि आमदारांनी दिलेला युती तोडण्याचा इशारा यामुळे महायुतीमध्ये ‘ बिघाडी’ होण्याची दाट शक्यता आहे. आता या नाराजीनाट्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Comments