सोलापूरात हादरलं: भांडण सोडवायला गेलेल्या मनसे पदाधिकार्याची हत्या
- Navnath Yewale
- Jan 2
- 2 min read

सोलापूर : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अर्ज मागे घेण्यासाठी धावपळ सुरू असताना सोलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. हा तरुण मनसेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भावी नगरसेवक तृतीयपंथी अय्युब सय्यद (वय 50) याची पाच दिवसांपूर्वी हत्येचे प्रकरण ताजे असतानाच मनसेच्या पदाधिकार्याची हत्या झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये ही घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये अर्ज मागे घण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला होता. भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्या विरोधात बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला होता. या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आलं होतं. मात्र त्याचं वेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी अवस्थेत बाळासाहेब सरवदे यांना तातडीने उपचारार्थ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सरवदे यांच्या नातेवाईक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात धाव घेतली.
दरम्यान प्रभाग क्रमांक 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून दबाव आणला जात होता. समाजात वाद नको म्हणून मनसे नेते बाळासाहेब सरवदे भांडण सोडवायला गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे. नातेवाईक व पदाधिकार्यांच्या आरोपानंतर सोलापूर पोलिसांनी 11 संशयितांची नोंद केली आहे. यातील 4 जणांना जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



Comments