
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!
- Navnath Yewale
- 6 hours ago
- 8 min read
मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका घेतल्याने विरोधकांच्या एकजूटीचे चित्र एकीकडे दिसत आहे. तर दुसरीकडे स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी काँग्रेसने केल्याने महाविकास आघाडीच्या एकजुटीला धक्का लागला आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या काँग्रेसच्या या भूमिकेचा फायदा कोणाला होईल हे पालिका निवडणूक निकलानंतर जरी स्पष्ट होणार असले, तरीही भाजपाच्या गोटात मुंबई महापालिका विजयाचे फटाके आत्तापासूनच फुटायला लागले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाज संपताच राजकीय फटाके फुटू लागतात हे नेहमीचेच असते. यंदाही ही परंपरा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी कायम ठेवली. मुंबई महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार! असे भाई जगताप यांनी प्रसार माध्यमासमोर येऊन स्पष्ट करताच महाविकास आघाडीत जोरदार फटाका फुटला. या फटाक्याच्या आवाजाने मुंबई प्रदेश काँग्रेस च्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनाही हादरा बसला. परंतु स्वबळावर निवडणूक लढविण्याचा दावा करताना भाई जगताप यांनी स्पष्ट केले केले की राज ठाकरेच काय! उद्धव ठाकरे यांच्याच बरोबर काँग्रेस आघाडी करणार नाही.
कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांनी लढवायच्या असतात. तळागाळातील कार्यकर्ता जिवंत राहिला तरच पक्ष जिवंत राहील आणि त्याचा फायदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळेल असेही भाई जगताप यांनी स्पष्ट केले. तसे पाहिले तर भाई जगताप यांनी असे विधान प्रथमच केले अशातला भाग नाही. भाई जगताप मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना पालिका निवडणुका स्वबळावर लढल्या जाणार याचा अनेक वेळा उल्लेख केला होता. भाई जगताप यांचे त्यावेळी असेही म्हणणे होते की मुंबई महापालिकेत काँग्रेसचे आज 30 नगरसेवक आहेत. स्वबळावर निवडणुका लढविल्यास नक्कीच ७५ च्या संख्येपर्यंत काँग्रेस मजल मारू शकेल.
यामागे भाई जगताप याचा दूरदृष्टीकोन अधिक आहे. जर मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिकेत भाजपापेक्षा विरोधकांच्या जागा अधिक विजयी झाल्या तर काँग्रेस पक्षाची बार्गेनिग पॉवर वाढू शकेल. म्हणजेच एकीकडे स्वबळावर निवडणुका लढल्याने तळागाळातील कार्यकर्ता जिवंत राहील, पक्ष मजबुत होईल आणि दुसरीकडे बार्गेनिग पॉवर वाढल्याने सत्तेत महत्वाची पदे मिळवीता येतील. भाई जगताप हे काँग्रेसमधील एक निष्ठावंत ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी मांडलेली राजकीय गणिते योग्य जरी असली तरी त्यांचे म्हणणे दिल्लीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते कितपत मान्य करतील असा प्रश्न आहे. कारण दिल्लीच्या काँग्रेस नेत्यांना सध्यस्थितीत कार्यकर्ता महत्वाचा नसून भाजपाचा पराभव कसा करता येईल हे महत्वाचे आहे. मग त्या कोणत्याही निवडणुका असो अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका असेना का! पण विरोधकांची मोट बांधून भाजपाला कसे पराभूत करता येईल हेच काँग्रेसचे महत्वाचे मिशन आहे. त्यामुळे कार्यकर्ता जगविण्याच्या नादात मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था भाजपाच्या हाती गेल्यात तर भाजपा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात मजबुत होईल.
कारण देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र प्रगतीशील आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत भाजपाला महाराष्ट्रात कसे रोखता येईल हेच काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील नेते पाहणार आहेत. यासाठी काँग्रेसचे दिल्लीचे नेते दोन नव्हे तर चार पावले मागे जाऊन भाजपा विरोधी पक्षाशी नक्कीच जुळवून घेतील असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. दिल्लीश्वरांचा हा सारा इतिहास पाहता मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सावध पवित्रा घेत भाई जगताप याचे ते व्यक्तिगत मत आहे असे स्पष्ट केले. भाई जगताप यांच्या बाबत वर्षा गायकवाड यांनी असे जरी विधान केले असले तरी ते कितपत योग्य आहे ते पहा... मागील आठवड्यात सांताक्रूझ येथे काँग्रेस पक्षाची 'Political Affairs Committee' ची एक बैठक झाली. या बैठकीत वर्षां गायकवाड, भाई जगताप, अस्लम शेख यांच्यासह अनेक मुंबईतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या बैठकीत जवळपास साऱ्याच नेत्यांनी मुंबई महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस पक्षांनी स्वबळावर लढवाव्यात असे सूचित करून कमिटीचे लक्ष वेधले होते. परंतु हा निर्णय महत्वपूर्ण असल्याने मुंबईच्या काँग्रेस नेत्यांची मागणी दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचविली जाईल इतकेच वैठकीत ठरले गेले. यामुळे निवडणुका स्वबळावर लढल्या जातील की नाही या निर्णयाचा चेंडू सध्या तरी काँग्रेसचे सर्वेसर्वा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि खर्गे यांच्या न्यायालयात गेलेला आहे. याबाबत निर्णय घेताना 'इथं आड तिथं विहीर' अशी अवस्था काँग्रेस नेत्यांची नक्कीच होणार आहे. कार्यकर्ताला मोठा करून पक्ष मजबुत करायचा की.. विरोधकांसोबत जावून भाजपाच्या विजयाला लगाम लावायचा असा प्रश्न काँग्रेससमोर निर्माण होणार आहे. हा गुंता काँग्रेसचे दिल्लीतील नेते कशापद्धतीने आणि किती वेळात सोडवतील हि येणारी वेळ सांगून जाईल.
शिवसेना फसली...
कार्यकर्ता जगला पाहिजे तरच पक्ष मजबूत होईल म्हणूनच निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत हे भाई जगताप यांचे विधान सद्यस्थितीच्या राजकारणात योग्यच असे आहे. त्यामुळेच पक्ष जर मजबुत करावयाचा असेल तर भाजपाची भीती न बाळगता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुका स्वबळावर लढून कार्यकर्त्यांना ताकत द्यायला हवी. नाहीतर बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची आज जी वाईट अवस्था झाली तशीच अवस्था इतर प्रादेशिक पक्षांची होण्यास फार वेळ लागणार नाही. कारण प्रत्येक राष्ट्रीय पक्षाचे धोरण एकच असते ते म्हणजे मिळेल त्यांना सोबत घेऊन देशाची सत्ता काबीज करणे. मग तो भाजपा असो किंवा काँग्रेस असो. तर प्रादेशिक पक्षाचे धोरण आणि तत्वे वेगळी असतात प्रादेशिक पक्ष हे त्या राज्याच्या अस्मितेशी निष्ठा ठेवून असतात. १९६६ साली स्थापन झालेला शिवसेना हा पक्ष प्रादेशिक अस्मितेशी जबरदस्त निगडित होता. किंबहुना मराठी माणूस आणि मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आक्रमकतेने लढणारा होता. याच एका गोष्टीमुळे अल्पावधीतच शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा धसका साऱ्या हिंदुस्थानने घेतला. पण आक्रमक असलेल्या याच शिवसेना पक्षाला हिंदुत्वाच्या जाळ्यात भाजपाने अलगदपणे अडकविले आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर याच भाजपाने नखे बाहेर काढून उद्धव ठाकरे यांच्या पोटात घुसवून त्यांना घायाळ केले. वास्तविक शिवसेना हा प्रादेशिक पक्ष.
परंतु बाळासाहेबांनी या पक्षाची रचनाच अशी काही केली होती की बाळासाहेबांच्या एका आदेशावर महाराष्ट्राच्या जागोजागी लाखो शिवसैनिक मिनिटात जमा होत असत. म्हणूनच कॅडर बेस संघटना म्हणून शिवसेनेची देशभरात ओळख होती. म्हणूनच राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपाने बाळासाहेबांचे सर्व अटी आणि शर्ती मान्य करीत शिवसेना पक्षाबरोबर युती केली. पण या कॅडर बेस प्रादेशिक संघटनेचा केवळ आणि केवळ हिंदुत्ववादीच्या नावाखाली प्रवास संपला गेला. किंबहुना संपविला गेला असे म्हटल्यास ते अधिक संयुक्तिक होईल. यामुळे ' तेल हि गेले आणि तूपही गेले.. हाती राहिले धुपाटणे' अशी अवस्था शिवसेनेची झाली. हिंदू माणूस विरोधात गेलाच पण मराठी माणुसही शिवसेनेच्या विरोधात जाताना दिसला. त्यामुळे मराठी माणूस तर संपलाच पण मुंबई सुद्धा मराठी माणसांच्या हातून आपसूकच जाण्याच्या तयारीत आहे. आश्चर्य आणि वाईट या गोष्टीचे वाटते की महाराष्ट्रापासून मुंबई तोडू पाहणाऱ्या काँग्रेस विरोधात लढण्यासाठी शिवसेना भाजपासोबत गेली.
तीस वर्षाच्या लढाईनंतर काँग्रेसला नमविण्यात आले, हरविण्यात आले, महाराष्ट्रातून काँग्रेसला संपविण्यात आले. पण आज त्याच काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला भाजपा विरोधात लढावे लागत आहे. हा नियतीचा खेळ समजायचा की १९८५ साली हिंदुत्वाच्या नावाखाली भाजपासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा समजायचा असा प्रश्न आज सर्वच शिवसैनिकांना सतावत आहे. पण शिवसेनेचे विजयी झालेले आमदार, खासदार, नगरसेवक यांच्यासमोर असा कोणताच प्रश्न सतावताना दिसत नाही. त्यांना मराठी माणसांचा प्रश्न सुटो या न सुटो किंवा मराठी माणसांवर अन्याय होवो या न होवो त्यांना कोणताच प्रश्न सतावत नाही. कार्यकर्ता जगला काय किंवा नाही जगला काय हाही त्यांच्या समोर प्रश्न सतावत नाही. पक्ष मजबुत झाला काय किंवा नाही झाला काय हाही प्रश्न त्यांना सतावत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे निवडून आलेले सारेच आर्थिक दृष्ट्या मजबुत झालेले आहेत. त्यामुळे भाजपाशी युती नाही झाली तरी त्यांना 'ईडी' ची भीती वगळता चिंता नाही. कारण काँग्रेसबरोबर आघाडी होणार ही त्यांना खात्री आहे. त्यामुळे कोणासोबत जाऊया पण माझ्या कपाळाला टीका लावा अशीच काहीशी अवस्था उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दोन्ही शिवसेत निवडून आलेल्याची झालेली आहे. शिवसेनेची ही अवस्था कोणा शिवसैनिकांमुळे किंवा मराठी माणसांमुळे झालेली नाही. तर शिवसेना नेतृवाच्या धरसोड वृत्तीमुळे आणि जागोजागी सुभेदार निर्माण केल्यामुळेच ही अवस्था झाली आहे.
इतके सारे होऊनही अजूनही दुसऱ्या राजकीय पक्षाचे बोट धरून चालण्याची शिवसेना नेतृत्वाची हौस अजून फिटलेली दिसत नाही. राज ठाकरे यांच्याशी दिलजमाई होऊनही आजही उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार नाहीत. दोघांना धरूनच राजकारण करण्याचा उद्धव ठाकरे सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. यामुळे मराठी माणूस तर कंटाळलेला आहेच पण शिवसैनिकांसमोरही संभ्रम निर्माण झालेला आहे. निदान मुंबई महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेनेने आणि मनसेने स्वबळावर लढाव्यात अशी शिवसैनिकांची, मनसैनिकांची आणि तमाम मराठी माणसांची इच्छा आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार हे फसवे नेतृत्व आहे. त्यांच्यासोबत जावू नये असे प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे. शरद पवार यांच्या आजपर्यंतच्या राजकारणात पवार घराण्याव्यतिरिक्त ते कोणाचेच होऊ शकलेले नाहीत. काँग्रेसमधून बाहेर पडले आणि परत काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेत राहिले. अजित पवार भाजपा सोबत गेले उपमुख्यमंत्री झालेत तरीही ते अजित पवार यांच्याशी घरी बोलावून चर्चा करीत आहेत. त्यामुळे शरद पवारांचे राजकारण कोणालाच कळले नाही. विलासराव देशमुख असो, सुशील कुमार शिंदे असो, अशोक चव्हाण असो महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते शरद पवार यांच्या राजकारणात अनेक वर्षे अडकून पडले पण पवारांच्या राजकारणातून सुटका होताच हे सारे नेते मोठे झालेत.
छगन भुजबळ असो, तटकरे असो, धनंजय मुंडे असो किंवा अजित पवार असो दिलीप वळसे पाटील असो या सर्वांनीही शरद पवार यांच्या राजकारणातून अखेरच्या वयात का असेना पण स्वतःची सुटका करून घेतली. काही काळ मनसेप्रमुख राज ठाकरे ही शरद पवार यांच्या राजकारणात अडकले होते. पण अल्पावधीतच राज ठाकरे यांनी स्वतःची सुटका करून घेतली. आता फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे शरद पवारांच्या राजकारणात अडकून पडलेले आहेत. बरेच वर्षे झालेत उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना शरद पवार यांच्या राजकारणातून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत. यामुळेच सारेच कंटाळलेले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांचा आत्मविश्वास संपू लागला आहे. हे सारे पाहता मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी दुर्दैवाने घेतलाच तर मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकण्यास वेळ लागणार नाही.
▪️भाजपाला संधी
काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार! भाई जगताप यांच्या या विधानाने महाविकास आघाडी समोर प्रश्न निर्माण झाला आहे. पण मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका कोणालाही सोबत न घेता यश कसे मिळू शकेल याचे उत्तर भाजपाला मिळालेले आहे. महाविकास आघाडी एकत्रित राहणार नाही याचा परफेक्ट आराखडा भाजपाने अनेक महिने आधीच रचून ठेवला आहे. याच आराखड्यातील पहिला भाग म्हणजे हिंदी सक्तीचा विषय. नसलेला विषय भाजपाने व्यवस्थितपणे खणून काढला यासाठी शिंदे शिवसेनेचे शिक्षणमंत्री असलेले दादा भुसे यांचा व्यवस्थित वापर करण्यात आला. दादा भुसे हिंदी सक्तीचे पुस्तक घेऊन दारोदारी फिरले आणि त्यांनी स्वतःचेच हसे करून घेतले. या हिंदी सक्तीला मनसे आणि शिवसेनेने विरोध करत राज आणि उद्धव ठाकरे बंधूना एकत्रित आणले गेलं. यामुळे मराठी माणसे एकत्रित आलीत. तर परप्रांतीय भाजपाच्या बाजूने एकवटली गेलीत. या विषयाबाबत शिंदे यांची शिवसेना कोणाचीच राहिली नाही.
कारण हिंदी सक्तीचे कसे योग्य आहे हे एकनाथ शिंदे यांचे दादा भुसे सांगत होते ते मराठी माणसांना मान्य नव्हते. दुसरा भाग कबुतरांचा होता. कबुतरखाना हलवा असे न्यायालयाचे आदेश असताना पालिकेने कबुतरखाना ताडपत्रीने झाकून ठेवला. आणि जाणीवपूर्वक वाद निर्माण केला. हा वाद भाजपाला हवा होताच. म्हणूनच मंगलप्रभात लोढा घटनास्थळी पोहचले आणि जैन समाजाला दिलासा मिळाला. त्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी बोरिवली येथे अनधिकृत पण उघडपणे कबुतरखाना चे उदघाट्न केले. यामुळे आपसूकच मुंबईचा जैन समाज भाजपाच्या बाजूने आला. मागील महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपाला ८५ हुन अधिक जागांवर विजय मिळाला होता. तर शिवसेनेला ९४ जागांवर विजय मिळवीता आला. हि सारी गणिते पाहता यंदा भाजपाला सर्वाधिक जागा स्वबळावर मिळविण्यास काहीच अडचण होणार नाही असे मुंबईत जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेले वातावरण पाहता म्हणावे लागेल.
राज ठाकरे उद्धव ठाकरे जरी एकत्रित आले तरी शंभर टक्के मराठी माणसांची एकजूट ठाकरे बंधू यांच्या पाठीशी राहणार नाही हेही तितकेच खरे आहे. कारण ठाकरे या नावाबाबत मराठी माणसांच्या भावना जरी जोडलेल्या असल्या तरी ठाकरे बंधू ज्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील त्याबाबत मराठी माणसांच्या भावना जोडलेल्या असतीलच असे अजिबात नाही. किंबहुना शिवसेनेच्या वर्षानुवर्षे निवडून आलेल्या उमेदवारालाच मराठी माणसे आणि काही अंशी शिवसैनिकही कंटाळलेले आहेत. हि परिस्थिती केवळ मुंबईतच नाही तर ठाणे, नवी मुंबई सह अनेक ठिकाणी आहे. हि वस्तुस्थिती आहे ती नाकारून चालणार नाही. भाजपाला हे पक्के ठाऊक आहे. म्हणूनच भाजपाने हिंदी सक्तीचा आणि कबुतरांचा विषय घेऊन आधीच परप्रांतीयांना एकत्रित केले. तर शिवसेनेतून दुरावलेला मराठी माणसांसाठी योग्य वेळी योग्य खेळी खेळली जाणार आहे. म्हणूनच प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळावर कसे लढतील हेच भाजपा पाहणार आहे. वेळ पडली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हि स्वबळावर लढविण्यास भाजपा भाग पाडेल.
मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतले जाईल असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे दोघांचे तसे मुंबईत वर्चस्व नाही. एकनाथ शिंदे पासून राज ठाकरे यांना दूर करून भाजपाने शिंदे यांचा मुंबईतून आधीच काटा काढलेला आहे. शिंदे यांना ठाणे प्रिय आहे म्हणूनच ठाण्यापुरतेच शिंदे यांना मर्यादित ठेवण्याचा भाजपा शेवटपर्यंत प्रयत्न करेल. राहिला प्रश्न अजित पवारांचा. अजित पवार देवाभाऊच्या शब्दाबाहेरचे नाहीत. त्यांची सुभेदारी पुणे महापालिका पुरतीच आहे. ती मिळाली की ते खुश. मग मुंबई महापालिकेत एक हाती सत्ता कशी मिळवीता येईल हाच भाजपाचा अजेंडा असेल. कारण ४५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेची मुदत ठेवीतील रक्कम ७५ हजार कोटी रुपये आहे. यासाठीच हि सारी लढाई आहे. भाई जगताप यांनीं स्वबळाचा नारा देवून भाजपाला वाट मोकळी करून दिली आहेच.
सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक,
संपादक, 'वृत्तमानस' मुंबई.
रविवार दि.२६ ऑक्टोबर २०२५
दूरध्वनी : ८९२८०५५९२७*



Comments