स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण; पुण्याच्या विशेष न्यायालयानं राहुल गांधींना फटकारलं
- Navnath Yewale
- Dec 3
- 2 min read

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बदनामी केल्याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी न्यायालयाच्या समन्स जारी करण्याच्या निर्णयावर आणि कामकाजावर शंका उपस्थित करणारी विधाने केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते.
त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात तपासणीदरम्यान पुरवा म्हणून न्यायालयात सादर केलेली सीडी रिकामी असल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या वकिलांनी आरोपीच्या सरतपासणीसाठी पुढील तारीख मागितली. त्यावर राहुल गांधीचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 309 अंतर्गत अर्ज करून तीव्र आक्षेप नोंदवला.
तक्रारदारांना सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येऊ नये, तातडीने पुरावा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी अॅड.पवार यांनी केली. या अर्जातील ‘तक्रारदारांनी न्यायालयावर अनावश्यक दबाव टाकून व तातडीने वातावरण निर्माण करून राहुल गांधीविरोधात समन्स जारी करण्याचा आदेश मिळविला आहे, तसेच तक्रारदारने कायदेशरी पुराव्याऐवजी मर्यादा ओलांडून समन्स मिळवले, या वाक्यांवर सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
राहुल गांधींच्या अर्जातील या विधानांमुळे न्यायालयाच्या निष्पक्ष कामकाजावर शंका निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर राहुल गांधींच्या वकिलांनी ‘तक्रारदारांकडून खटला जाणूनबुजून लांबविण्यात येत असून, पुरावे सादर करण्यात अपयशी ठरत आहे, असे स्पष्टीकरण दिले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर राहुल गांधींच्या आर्जात न्यायालयाच्या कामकाजावर शंका उपस्थित करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
आक्षेप असल्यास योग्य न्यायालयात आव्हान द्यावे- न्यायालय
‘ न्यायालयाने काढलेल्या समन्सच्या आदेशाबाबत आरोपीला आक्षेप असल्यास त्यावर योग्य न्यायालयात आव्हान देता येईल. मात्र, त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांवर कोणतीही टिप्पणी करू नये. त्यामुळे आरोपीने न्यायालयाच्या अंतिम किंवा आव्हान न दिलेल्या आदेशावर टिप्पणी करू नये. असे स्पष्ट निर्देश विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी राहुल गांधींना दिले आहेत. लोकप्रतिनिधींवर दाखल दाव्यांची सुनावणी घेणार्या पुण्यातील विशेष न्यायालयात या याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या वतीने अॅड. संग्राम कोल्हटकर यांच्याकडून राहुल गांधींची सरतपासणी घेऊन पुरावा नोंदविण्यात येत आहे.



Comments