हापूस'वर डोळा; कोकणच्या अस्मितेलाच आव्हान...!
राणी एलिझाबेथपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत गाजलेला कोकणचा राजा आता वलसाडची दावेदारी कशासाठी?
कोकणचा हापूस म्हणजे केवळ एक फळ नाही, तर रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या मातीचा सुगंध... शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्याच्या कष्टांची कमाई आणि या भूमीची जगभर पोहोचलेली ओळख आहे. देवगडचा हापूस म्हटला की, त्याचा दरवळ, त्याची चव आणि त्याची प्रतिष्ठा वेगळीच..! म्हणूनच त्याला कोकणचा राजा म्हटलं जातं. पण आता याच राजाच्या नावावर गुजरातमधील 'वलसाड'ची दावेदारी पुढे येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसऱ्याच्या घरातील सोन्याचा मुकुट आपल्या डोक्यावर ठेवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना...?

हापूसचा इतिहास हा आजचा नाही. त्याची ख्याती अनेक दशकांपासून, देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. जुन्या जाणत्या मंडळींकडून एक रंजक आठवण सांगितली जाते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे हापूस आंब्यांची पेटी भेट म्हणून पाठवली होती. या आंब्याची चव महाराणींना इतकी आवडली की, त्यांनी त्याचं कौतुक करत नेहरूंचे आभार मानल्याची आठवण सांगितली जाते. त्यावेळच्या 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्येही यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाल्याचं जुन्या मंडळींचं म्हणणं आहे. हापूसच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची ही लोकस्मृती निश्चितच उल्लेखनीय आहे.
१९५३ मध्ये महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं भारतीय 'अल्फान्सो' (हापूस )आंबे लंडनला पाठवण्यात आल्याचा संदर्भही उपलब्ध आहे. चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोऊ एन लाई यांच्यासाठी १९५५ मध्ये पाठवलेल्या आंब्याच्या रोपांमध्ये महाराष्ट्रातील 'अल्फान्सो' (हापूस ) चाही समावेश होता. १९६१ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या भेटीच्या वेळीही हापूसचा पाहुणचार चर्चेत आला होता. म्हणजे कोकणचा हा राजा केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख निर्माण करून होता.
इतिहास एवढ्यावरच थांबत नाही... १९२८ मध्ये मुंबईच्या 'क्रॉफर्ड मार्केट'मध्ये भरलेल्या आंबा प्रदर्शनात मालवणच्या 'हापूस आंब्याला'ही विशेष पारितोषिक मिळाल्याचा संदर्भ 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या २०२२ मधील एका लेखात प्रसिद्ध झाला आहे. १९३१ मध्ये भारतीय आंब्यांची पेटी इंग्लंडला पाठवण्यात आल्याचाही उल्लेख आहे. यावरून कोकणच्या आंब्याची परदेशातील ओळख किती जुनी आहे, हे लक्षात येतं.

आता या पार्श्वभूमीवर गुजरातमधील वलसाडच्या हापूस नामकरणाची चर्चा गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. गुजरातमध्ये आंबा उत्पादन होतं, तिथल्या शेतकऱ्यांनाही आपल्या उत्पादनाची ओळख निर्माण करण्याचा अधिकार आहे. पण एखाद्या भागात 'हापूस'सारखी जात लावली म्हणून त्या प्रदेशाला कोकणच्या हापूसची ऐतिहासिक ओळख आणि प्रतिष्ठा आपोआप मिळत नाही. वलसाडच्या आंब्याची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असेल तर त्याला कुणाची हरकत असण्याचं कारण नाही. मात्र कोकणच्या हापूसच्या नावावरच बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो खपवून घेता कामा नये.
विशेष म्हणजे, हापूसला भौगोलिक मानांकन म्हणजेच GI मिळालेलं आहे. भारताच्या 'जीआय ' नोंदणीमध्ये 'अल्फानसो ' या नावाची नोंदणी २०१८ मध्ये झाली. अर्ज क्रमांक १३९ आणि प्रमाणपत्र क्रमांक ३२४ असा त्याचा अधिकृत तपशील आहे. या नोंदणीचे भौगोलिक क्षेत्र महाराष्ट्र आहे. देवगड हापूससाठी दाखल झालेला स्वतंत्र अर्जही मुख्य नोंदणी प्रक्रियेत विलीन करण्यात आला आहे. म्हणजेच देवगड आणि रत्नागिरीच्या हापूसची ओळख ही केवळ जाहिरातीने निर्माण झालेली नाही, तर तिला कायदेशीर मान्यताही आहे. मग प्रश्न असा आहे की, या 'जीआय' मानांकनाचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातील यंत्रणा नेमकं काय करत आहे.
गुजरातमधून हापूस नावाच्या वापराबाबत काही अधिकृत प्रस्ताव किंवा अर्ज असल्यास त्याची वस्तुस्थिती जनतेसमोर आणली पाहिजे. केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाही. कोकण कृषी विद्यापीठ,'जीआय' नोंदणीशी संबंधित संस्था, आंबा उत्पादक संघटना आणि राज्य सरकार यांनी एकत्र येऊन या विषयावर ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.
एकीकडे कोकणातील आंबा उत्पादकांना उत्पादन खर्च, हवामान बदल, अवकाळी पाऊस, रोगराई आणि निर्यातीतील अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे बाजारपेठेत हापूसच्या नावाचा गैरवापर होण्याची भीती आहे. अशा वेळी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी संबंधित यंत्रणा शांत बसणार असतील, तर कोकणच्या शेतकऱ्यांनी कोणाकडं पाहायचं..?
देवगडच्या हापूसचा दरवळ हा कोणत्याही एका व्यापाऱ्याचा किंवा संस्थेचा मालकी हक्क नाही. तो या मातीचा वारसा आहे. पिढ्यानपिढ्या आंब्याची कलमं जोपासणाऱ्या शेतकऱ्यांच्या घामाचा तो सुगंध आहे. हा वारसा जपण्यासाठी केवळ जीआय प्रमाणपत्र भिंतीवर लावून उपयोग नाही; त्याच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागेल.
कोकणच्या हापूसला राणीच्या दरबारापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या इतिहासाचा अभिमान बाळगायचा आणि त्याच हापूसच्या नावावर दुसऱ्यानं दावा सांगितल्यावर गप्प बसायचं , हे कसं चालेल...!
गुजरातनं आपला आंबा मोठा करावा, त्याला स्वतंत्र नाव मिळवून द्यावं... पण कोकणच्या हापूसच्या नावावर डोळा ठेवू नये. कारण हापूसचं नाव ही केवळ बाजारपेठेतील पाटी नाही, ती कोकणच्या अस्मितेची मोहर आहे. कोकणच्या शेतकऱ्यांनो, आता तरी जागे व्हा...! हापूसचा राजा आहे, त्याचे राज्यही कोकणचेच राहिले पाहिजे...!
-राजन चव्हाण,
सिंधुदुर्ग
८३९०००६१९१