एलपीजी गॅस पुन्हा भडकला; घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 29 रुपयांची वाढ
- Navnath Yewale
- 3 days ago
- 1 min read

महागाईच्या झळा सोसणार्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा आर्थिक झटका बसला आहे. सरकारी ते विपणन कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांची अंमलबजावणी तत्काळ करण्यत आली असून या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी कुटुंबांच्यवा मासिक खर्चात वाढ होणार आहे.
अखाती देशातील युद्धामुळे गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट पुन्हा कोलमडण्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख शहरातील नवीन एलपीजी दरामध्ये वाढ झाली आहे त्यानुसार
दिल्ली - 942 रुपये, कोलकाता 968 रुपये, मुंबई 941.50 रुपये, पुणे 941.50 रुपये, चेन्नई 957.50 रुपये प्रमाणे आहेत.
ज्यामध्ये मुंबई आणि पुण्यात घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर 941.50 रुपयांवर पोहोचला असून महाराष्ट्रातील ग्राहकांनाही या दरवाढीचा थेट फटका बसणार आहे.
व्यवसायिक सिलेंडर आधीच महाग: यापूर्वी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडच्या दरातही वाढ करण्यात आली होती. मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीलाही व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढविण्यात आले. आता घरगुती सिलेंडरच्या दरवाढीमुळे महागाईच्या मुद्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आणि जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवरील दबावामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती वाढण्याची शक्यता आधीपासूनच वर्तविण्यात येत होती. विशेषत: पश्चिम आशियातील तणावामुळे कच्चा तेलाच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. शिवाय केंद्र सरकारने देशातील एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला आहे.
गॅस सिलेंडरच्या नव्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून महागाईच्या वाढत्या भारामुळे घरखर्चाचे नियोजन करणे अधिक कठीण बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे.



Comments