अजितदादांच्या अपघातामागे कॅप्टन खरातचा हात? त्या विमानासमोर फोटो, आमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

दिवंगत उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने विविध आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यादरम्यान नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामागे आहे का? याचा तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातावर अगदी सुरुवातीपासून अमोल मिटकरी सातत्याने सवाल उपस्थित करीत आहेत. विमान कंपनीच्या अधिकार्यांपासून मालकाच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात याचे कांड समोर आल्यानंतर आणि राजकीय नेत्यांचे त्याच्याकडे उठबस पाहता अजित पवार यांच्या विमान अपघातामागे त्याचा काही हात आहे का? असा सवाल उपस्थित करत आमदार मिटकरी यांनी चौकशीची मागणी केली आहे.
आमदार मिटकरी म्हणाले की, कॅप्टन खरात नावाच्या भोंदू बाबाचा भांडाफोड काल पासून सुरू आहे. त्याच्या अश्लिल व्हिडओ क्लिप्स पोलिसांनी छापेमारीत जप्त केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. एका तक्रारीवरून त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. मात्र त्याचा भक्त संप्रदाय राजकीय आणि बॉलिवूडपर्यंत असल्याचे कळत आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा व्हीएसआर विमान कंपनीच्या पायटसोबत तसेच त्याच विमानासमोर उभा आहे. काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी आणि देवगिरी बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा थोतांडावर आमचा किंवा अजितदादांचा विश्वास नव्हता, मात्र हा झालेला प्रयोग अशोक खरात यांच्या सांगण्यावरून झाला का? आणि याचा धागा व्हीएसआर कंपनीपर्यंत जात असेल तर, अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन अशोक खरातांचा हात असल्याचा संशय बळावतो. म्हणून अजित दादांच्या विमान अपघात संदर्भात कॅप्टन खरात याचा कसून तास झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.



Comments