अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक स्थगित
- Navnath Yewale
- Dec 1
- 2 min read
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश; उज्ज्वला थिटेंना अर्ज दाखल करता येणार नाही

सोलापूर: राज्यभर चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केले आहेत. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. यामुळे एकच चर्चा रंगली आहे. अनगर नगरपंचायतीत प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राहिला आहे. त्या बिनविरोध झाल्या आहेत. मात्र आता या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
सर्व प्रक्रिया बिनविरोध पार पडली असली तरी प्राजक्ता पाटील यांना अधिकृतपणे नगराध्यक्ष जाहीर होण्यासाठी त्यांना 10 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या उमेदवारांना अर्ज मागे घ्यायचा आहे, त्यांना 4 ते 10 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील मंगळवेढा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायत यांच्या निवड प्रक्रियेला स्थगिती आदेश दिले आहेत. सुधारित कार्यक्रमानुसार येथील निवडणूक प्रक्रिया घेतली जाईल असे आदेश दिले आहेत.
अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक मात्र राज्यभर गाजली. राजन पाटील यांचे एकहाती वर्चस्व असलेल्या या नगरपंचायतीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी थेट अर्ज दाखल केला, त्यामुळे या निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली. या निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे आणि सरस्वती शिंदे यांन अपक्ष अर्ज दाखल केला होता.छाननीत उज्ज्वला थिटे यांनी अर्जात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला. तर सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे प्राजक्ता पाटील या बिनविरोध निवडून आल्या.
उच्च न्यायालयात दाद मागणार: “ मा. न्यायालयाने आमचा अर्ज फेटाळला असला तरी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. तोपर्यंत निवडणूक स्थगित ठेवावी अशी मागणी मी करणार आहे” अर्ज दाखल करण्यासाठी अनेक अडथळे आले, परंतुु आम्ही न्यायालयात लढू आणि जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत निवडणूक स्थगित रहावी” या स्थगितीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि पक्षप्रमुख यांच्यात चर्चा सुरू आहे.
उज्जवला थिटे ( राष्ट्रवादी अजित पवार गट)



Comments