आण्णा हजारेंचा पुन्हा आंदोलनाचा इशारा!
- Navnath Yewale
- Dec 11, 2025
- 1 min read
लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 30 जानेवारी पासून राळेगणसिद्धीत यादवबाब मंदिरासमोर उपोषण

आहिल्यानगर: ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे जनक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याचा निणृय जाहीर केला असून ही मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी न झाल्याने नाराज झालेल्या आण्णा हजारे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित आपल्या उपोषणाची अधिकृत घोषणा केली आहे. येत्या 30 जानेवारी 2026 पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात ते उपोषणास सुरुवात करणार आहेत. सरकारकडून दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी तत्काळ व्हावी, या मागणीसाठी आण्णा पुन्हा एकदा आंदोलनाच्या मार्गावर उतरणार आहेत. यामुळे राज्य सरकारसमोर नव्या अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधेयक मंजूर, पण अंमलबजावणी नाही- आण्णांची नाराजी
आण्णा हजारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, 28 डिसेंबर 2022 रोजी विधानसभेत आणि 15 डिसेंबर 2023 रोजी विधानपरषिदेने लोकायुक्त विधेयक मंजूर केले होते. मंजूर असूनही दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला, तरीही या कायद्याची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. यामुळे शासनाची भ्रष्टाचारविरोधातील इच्छाशक्ती कमजोर असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट करत टोला लगावला आहे. लोकायुक्त कायदा हा सार्वजनिक यंत्रणेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी महत्वाचा साधन असूनही तो लागू न करण्यामागील हेतू संशयास्पद असल्याचा सूरही त्यांच्या पत्रातून उमटतो.
अण्णा हजारे यांनी आयुष्यभर भ्रष्टाचारविरोधी लढा दिला. 2011 मधील ऐतिहासिक जनलोकपाल आंदोलनाने देशाची राजकीय दिशा बदलली होती. आता पुन्हा तशाच दणक्यात ते आंदोलनाला सज्ज होत आहेत. यावेळी त्यांची एकच मागणी आहे. “ लोकायुक्त कायद्याची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी करा” सरकारने केलेल्या अश्वासनांवर आता विश्वास ठेवणे कठीण झाल्यानेच उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



Comments