top of page

आरोपीला घेवून जाणार्‍या तेलंगणा पोलिसांच्या वाहनांवर हल्ला; आरोपी हातकड्यांसह फरार, पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार?

किनवट: चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला तेलंगणाकडे घेऊन जाणार्‍या पोलिसांच्या पथकावर हल्ल्याची घटना किवनट तालुक्यातील चिखली येथे घडली. या आरोपीच्या नातेवाईकांनी केलेल्या या हल्ल्यात पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. या गोंधळाचा फायदा घेवून आरोपी हातकड्यांसह फरार झाल्याने खळबळ उडाली आहे.


तेलंगणातील आदिलाबाद पोलिसांच्या तपासात असलेल्या अ‍ॅटो चोरी प्रकरणातील आरोपी शेख वखार यास तेलंगणा पोलिस अटक करून आदिलाबादच्या दिशेने जात असताना आरोपीच्या नातेवाईकांनी किवनट- आदिलाबाद मार्गावर चिखली गावाजवळ पोलिस पथकाची गाडी आडवून वाहनावर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात पोलिस वाहनांचे मोठे नुकसान झाले.

हल्ल्यादरम्यान उडालेल्या गोंधळाचा गैरफायदा घेवून आरोपी शेख वखार हा हातकड्यांसह जंगलाच्या दिशेने पळून गेला. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचेही बोलले जात असले तरी गोळीबाराबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. घटनेनंतर तेलंगणा पोलिसांचे पथक किनवट पोलिस ठाण्यात दाखल झाले असून,हल्ल्यामध्ये वाहनांची तोडफोड आणि आरोपीच्या फरारप्रकरणाी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


दरम्यान पोलिसांच्या ताब्यातील आरोपी असा हल्ला करून त्यास पळवून नेण्याल्याने कायदा सुव्यवस्थचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिखली परिसरात नेमके किती जण या हल्ल्यात सहभागी होते, हल्ल्यामागील कारण आणि फरार आरोपीचा ठावठिकाणा याचा तपास आता दोन्ही राज्यांंच्या पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

Comments


bottom of page