आहिल्यानगरच्या त्या काँग्रेस अध्यक्षांच्या अडचणीत वाढ!
- Navnath Yewale
- Nov 28
- 1 min read
अपहरण करून मारहाण केल्याचं प्रकरण; भाषणात महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप

आहिल्यानगर: हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी अपहरण करून जीवघेणा हल्ला केलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाषणात महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ऋषिकेश सरोदे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
ऋषिकेश सरोदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, समाज माध्यमांवर बुधवारी एक चित्रफित प्रसारित झाली आहे. ही चित्रफित पाहिल्यावर, सचिन गुजर यांनी नगरपरिषद निवडणुकीतील, प्रभाग दोनमधील प्रचारसभेत बोलताना महापुरूषांबद्दल एकेरी भाषेत अवमानकारक उल्लेख केल्याचे दिसून येते. यावरून श्रीरामपूर शहर पोलिसांकडे ऋषिकेश सरोदे यांनी तक्रार दिली. पोलिसांनी सचिन गुजर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या मारहाणीत त्यांच्यावर तीनदा पिस्तुल राखचण्यात आलं. विविस्त्र करून त्यांना रस्त्यावर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून, तिघांना अटक केली आहे. यावेळी राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली.
श्रीरामपूरमधील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगून चंदू आगे याने हल्ल्याची जबाबदारी घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख
केल्याने आपण हे कृत्य केल्याचा दावा, समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर करत चंदू आगे याने केला.
दरम्यान, भाजप अन् हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी महापुरुषांचा एकेरी उल्लेख करत अवमान केल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या निषेध आंदोलनाला भाजपने आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन करत प्रत्यूत्तर दिले. यावरून श्रीरामपूरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याची चित्रफित पोलिसांकडे सादर केली आहे.



Comments