ओएनजीसी प्लांटमध्ये गॅस गळती, मोठा स्फोट; आकाशात आगीच्या ज्वाळांचे लोट
- Navnath Yewale
- 3d
- 1 min read

नवीदिल्ली/ कोनसीमा: ओएनजीसी च्या मालकीच्या गॅस विहिरीत अचानक गळती होऊन स्फोट झाल्याने आंध्र प्रदेशातील एका शांत ग्रामीण भागात गोंधळ उडाला. आकाशात ज्वाला उसळल्या, काळ्या धुराचे लोट उठले आणि लोक घाबरून पळून गेले. सोशल मिडियावरील व्हिडिओंवरून अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून आली. सदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
आंध्र प्रदेशातील डॉ. बीआर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील मोरी गावात ही घटना घडली आहे. दीप इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे चालवल्या जाणार्या मोरी-5 नावाच्या गॅस विहिरीत अचनाक गॅस गळती झाली. ही विहीर ओएनजीसी प्रकल्पाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे गॅसच्या दाबात असंतुलन निर्माण झाले, ज्यामुळे आग लागली. काही क्षणातच आग भडकली आणि दूरवर मोठा स्फोट ऐकू आला.
ओएनजीसी च्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, आंध्र प्रदेशातील मोरी फील्डमधील वेल मोरी क्रमांक 5 येथे वर्कओव्हर ऑपरेशन दरम्यान गॅस गळती झाली. पीईसी ऑपरेटर डीप इंडस्ट्रीज लिमिटेडने ओएनजीसी ला या घटनेची माहिती दिली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही विहीर एका दुर्गम भागात आहे. जिथे सुमारे 500 ते 600 मीटरच्या परिघात कोणतीही मानवी वस्ती नाही.
ओएनजीसी ने स्पष्ट केले की, या घटनेत कोणत्याही जखमी किंवा जीववितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही. खबरदारी म्हणून, प्रभावित क्षेत्र पूर्णपणे वेढा घालून सुरक्षित करण्यात आले आहे आणि शीतकरण ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
ओएनजीसी ने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या क्रायसिस मॅनेजमेंट टीम्स ( सीएमटी आणि आरसीएमटी) तैनात केल्या आहेत. विहिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आवश्यक असल्यास ती बंद करण्यासाठी तयारी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विहीर नियंत्रण तज्ञांचे देखील समन्वय साधण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि नरसापूरमसह जवळच्या भागातून अतिरिक्त उपकरणे आणली जात आहेत.



Comments