top of page

कर्तबगार आणि संवेदनशिल ‘दादा’ पर्व हरपले अजित दादा च्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला!


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आज बुधवारी दि.28 जानेवारी 2026 बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. कर्तबगार, कर्तव्यकठोर आणि संवेदनशिल अशी महती असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांची अचानक एक्झीट राज्यातील प्रत्येकांसाठी अश्वासनिय आहे. या भीषण अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचे पार्थिव सकाळी घटनास्थळावरून बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणण्यात आले. अपघाताची बातमी वार्‍यासारखी देशभरात पसरली. अजित पवारांच्या चाहत्यांनी वैद्यकिय महाविद्यालयासमोर गर्दी केली होती. बारामतीकरांसह राज्यभरातून आलेल्या चाहत्यांनी आश्रू ढाळत ‘अजित दादा अमर रहे’ चा नारा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.


अजित दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील मान्यवरांनी अजित दादांना जड अंत:करणाने श्रद्धांजली वाहिली.




श्री. अजित पवार जी हे लोकनेते होते, त्यांचे तळागाळातील लोकांशी मजबूत संबंध होते. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्यात आघाडीवर असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींबद्दलची त्यांची समज आणि गरीब आणि दलितांना सक्षम बनवण्याची त्यांची आवड देखील उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन खूप धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.

प्रधानमंत्री - नरेंद्र मोदी..



अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे.
खा. शरद पवार..



आज एका अत्यंत दुःखद अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीएचे (NDA) ज्येष्ठ सहकारी अजित पवार जी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. अजित पवार जी यांनी गेली साडेतीन दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही NDA कुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे. मी पवार परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार परिवारासोबत खंबीरपणे उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो.
ॐ शांती शांती शांती

केंद्रीय गृह मंत्री.. अमित शहा..


 

 

जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य 4 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

 

आज माझा.. मोठा भाऊ हारपला: “ मनाला वेदना आणि चटका देणारी घटना आहे. अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती. चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी ते मनाने निर्मळ होते याचा अनुभव मीही घेतलेला आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलं. एकदा कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ते करायचेच. आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रात काम केलं. अजित दादांनी सकाळी 6 वाजताही लोकांना भेटत असत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपलाआहे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. आज सकाळी जेव्हा घटना कळली तेव्हा परवाच्याच भेटीची दृश्य समोर येत होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होत. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन निघणारं नुकसान झालेलं आहे. एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे” 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

 

महाराष्ट्राच्या विकासपुरुषास भावपूर्ण श्रद्धांजली..! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संपूर्ण राज्याचे लाडके आणि हक्काचे दादा मा. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे. खरतर अजूनही विश्वास बसत नाही की अजित दादा आता आपल्यात नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राने आज एक उत्तम प्रशासक, शिस्तशील नेतृत्व आणि जनतेसाठी भल्या पहाटेपासूनच काम करणारा हक्काचा माणूस गमावला आहे. दादा तुमचे हे अकाली जाणे सर्वसामान्य जनतेलाही बिलकुल रुचले नाही.आज फक्त बारामतीकरच नव्हे तर राज्यातील प्रत्येक सर्वसामान्याच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि सोबतच पोरकेपणाची भावना आहे.ज्या माणसाने आयुष्याचा प्रत्येक क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि फाईल्सचा निपटारा करण्यासाठी वेचला, तो आवाज आज शांत झाला, यावर विश्वासच बसत नाही. दादांचा स्वभाव अनेकांना कडक वाटला असेल, पण त्या कडकपणामागे राज्याच्या हिताची कळकळ आणि कार्यकर्त्यांबद्दलचा जिव्हाळा होता. राजकारणात शब्द बदलणारे खूप पाहिले, पण "दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणारच" हा जनतेचा विश्वास आता कायमचा स्मृती बनला आहे. मंत्रालयातील त्या रिकाम्या दालनस देखील अजित पवार यांच्यासारख्या कार्यशील व कर्तृत्व्वान नेतृत्वाची कायम उणीव भासेल. दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील..!

 

खा. अमोल कोल्हे..

 

 

आमचे "दादा" गेले..!
 अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीने सुन्न झालो आहे. परिवारातीलच दादांचे आज निधन झाले आहे.माझ्या सांस्कृतिक क्षेत्रातील कारकिर्दीत दादांचा कायमच पाठिंबा आणि आधार लाभला आहे.आपल्याच ग्रामीण भागातील तरुण अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करतो आहे याचे नेहमीच त्यांना अप्रुप होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षीय कालखंडात काही अपरिहार्य परिस्थिती इतरांनी माझ्याभोवती निर्माण केली असता केवळ दादांच्या मार्गदर्शनाने आणि भक्कम पाठिंब्यानेच मी आजवर अध्यक्ष म्हणून काम पाहू शकत आहे. या कालावधीत दादांशी अनेकदा संपर्क साधावा लागला. दादांच्या इतका प्रशासनावर उत्तम पकड असणारा राजकारणी मी अनुभवला आहे.व्रुद्ध कलावंतांचे काही महिन्याचे थकीत मानधनाचे चेक सांस्कृतिक खात्याकडून काही तासात त्यांनी काढून दिलेले मी पाहिले आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पहिले चित्रपट संमेलन भरवण्यासाठी त्यांनी सक्रिय पाठिंबा दाखविला होता. कल्पना समजून घेतल्यानंतर लगेचच त्यांनी पुण्याचे त्यावेळच्या जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्यक्ष बोलावून आम्हाला सक्रीय व आर्थिक मदत शासनातर्फे करण्यास सांगितली होती. साहित्य, नाटक आणि चित्रपट या तीनही कलांचे एकत्रित असे संकुल असावे अशी कल्पना त्यांना सांगितली , ती त्यांना एवढी आवडली की महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी  सरकार असे संकुल उभे करील असे त्यांनी जाहिर करुनही टाकले. त्यानंतर अधिकार्यांचेच फोन येवू लागले की दादांनी सांगितले प्रमाणे संकुलासाठी जागा पाहिली आहे तुम्ही येवून पाहून जा.कामगार कल्याणकारी मंडळाच्या धर्तीवर कलावंत कल्याणकारी मंडळ व्हावे यासाठी ते कायमच आग्रही होते.पुणे येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे १०० वे नाट्य संमेलन मी पुणे शाखेचा अध्यक्ष असताना पार पाडायचे ठरले असताना दादांनी महाराष्ट्र शासनातर्फे भरघोस आर्थिक मदत उपलब्ध करून दिली होती.दादा अर्थमंत्री असतानाच सांस्कृतिक खात्यासाठी काही कोटी मिळणारे बजेट दादांनी वाढवून काही 'शे' कोटी केले होते. तशी घोषणा त्यांनी त्या त्या वेळच्या अर्थसंकल्पात केली होती.कलाकारांच्या समस्या सोडवणारा हक्काचा दादा आपल्यातून हरपला आहे.\दादा आता तुम्ही असणार नाहीत ही भावनाच आम्हाला पोरके करणारी आहे. परमेश्वर कै. अजित दादा पवार साहेबांच्या आत्म्याला शांती देवो व संपूर्ण पवार कुटुंबीय व समस्त कार्यकर्ते यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
मेघराज राजे भोसले - अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ..

 

 

  देशातील तरुण फळीतील नेता गमावला  राज्याचे एक उमदे नेतृत्व कुशल प्रशासक शिस्तप्रिय नेता म्हणून ज्यांची ओळख होती असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखदायक असून देशातील तरुण पिढी फळीतील एक उत्तम नेता गमावला असल्याची भावना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली आहे .1990 साली जेव्हा काँग्रेस सरकार स्थापन झाले तेव्हापासून अजितदादा हे राज्यमंत्री म्हणून सोबत काम करत होते, पुढे सातत्याने ते मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्या कामाची पद्धत आम्ही जवळून अनुभवली आहे, कुशल प्रशासक शिस्तप्रिय नेता म्हणून त्यांची राज्यात ओळख होती. राज्याचे एक उमदे नेतृत्व आपल्यापासून कायम दुरावले आहे,पक्षाबरोबरच राज्याचेही मोठे नुकसान झाले आहे, देशातील तरुण फळीतील एक उमदा नेता आपण गमावला आहे,पवार कुटुंबीय आणि पक्षातील कार्यकर्ते राज्यातील कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यातून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी. 

 माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर 

 

Comments


bottom of page