कलाकेंद्रातील गर्भवती महिलेला मृत समजून जंगलात जाळले; पोलिसांनी तिन दिवसांत हत्याकांडाचा छडा लावला, चार आरोपी अटकेत

धुळे/ जामखेड: कलाकेंद्रातील गर्भवती नर्तिकेचा शेकडो किलोमिटर दूर नेऊन जाळून खून केल्याचा धक्कादायक हत्याकांड समोर आला आहे. धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी उलगडा केला आहे. रायगड येथील पिंकी हनुमंत काटकर या 31 वर्षीय गर्भवती महिलेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
धुळे जिल्ह्यातील धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताडबारी शिवारातील निर्मनुष्य जंगलात दि.22 सप्टेंबर रोजी एका अनोळची महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल. घटनेची माहिती मिळातच मोहाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासला सुरुवात केली. मृत महिलेची ओळख पिंकी हनुमंत काटकर, वय 31, रा. रायगड अशी पटली तर शवविच्छेदन अहवालात महिला गर्भवती असल्याचे आणि तिच्या पोटातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. गर्भवती महिलेची हत्या झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण , सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत या हत्याकांडाचा छडा लावला. जामखेड (जि.अहिल्यानगर) येथील सप्तसूर कलाकेंद्रातील अंतर्गत वादातून हत्येचा कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पिंकी काटकर हिचा कलाकेंद्रातील काही व्यक्तींशी वाद झाला होता. त्यानंतर बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात तिला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर ती बेशुद्ध पडली. ती मृत झाल्याचा समज झाल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर आरोपींनी तिला वाहनात टाकून राजस्थानच्या दिशेने निघाल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र, धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरातील निर्मनुष्य जंगलात थांबून तिच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले आणि तिला जाळण्यात आले.
दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी चाळीसगाव-धुळे महामार्गालगतच्या वनक्षेत्रात एका महिलेचा गंभीररित्या जळालेल्या मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटवणे आणि आरोपीपर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. फॉरेन्सिक तपास आणि घटनास्थळावरील पुरावे गोळा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली सदर महिला ही धाराशिव येथील महाकाली कला केंद्रात काम करत होती तेथेच तिची व आरोपींची ओळख झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीपर्यंत पोहोचले.
स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावरील तब्बल 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, संशयित वाहनाचा माग काढत पोलिस थेट जामखेडमधील सप्तसूर कला केंद्रापर्यंत पोहोचले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि वाहनाच्या हालचालींचा मागोवा घेत सहा संशयितांची ओळख पटवण्यात आली. या प्रकरणी सर्फराज उर्फ शफिक मोमीन (38), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (31), लक्ष्मी बालाजी पवार (30) आणि स्वाती उर्फ आरती गणेश कुर्हाडे (28) यांना अटक करण्यात आली आहे. फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे दोघे आरोप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.



Comments