top of page

कल्याण-डोंबिवली पक्षांतर वादावरुन फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना सुनावले

ree

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आणि पक्षप्रवेशाच्या राजकारणाने मंगळवारी (18 नोव्हेंबर) मोठा राजकीय भूकंप घडवला. कल्याण-डोंबिवली परिसरातील पक्षप्रवेशावरून तीव्र नाराजीमुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनच्या मंत्र्यांना सडेतोड उत्तर देत “ तुम्हीच सुरुवात केली ” अशा शब्दांत झापल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोबिवली महानगरपालिका क्षेत्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी (दि.18) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या (शिंदे गट) काही महत्वाच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात दिवंगत वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, महेश पाटील, सायली विचारे यांचा समावेश होता. महायुतीमध्ये असतानाही मित्रपक्षाने आपल्याच कार्यकर्त्यांना फेडल्यामुळे यावरून शिंदे गटात अस्वस्था पसरली. कल्याण- डोंबिवलीतील या पक्षप्रवेशाच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेच्या इतर सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीकडे पाठ फिरवून भाजपविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.


दरम्यान बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्षप्रवेशाबद्दल आपली तक्रार मांडली यावर फडणवीस यांनी शिवसेना मंत्र्यांना स्पष्टपणे सुनावले. फडणवीस यांनी मंत्र्यांना ठोण जिल्ह्यातील उल्हासनगर मधील पक्षप्रवेशाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “ याची सुरुवात भाजपने नाही तर तुम्ही (शिवसेनेने) उल्हासनगरमधून केली. तुम्ही करणार असाल तर ते चालवून घ्यायचे आणि भाजपने केले तर चालणार नाही, असे दुहेरी धोरण कसे चालेल?”


मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नाराजी आणि भाजप- शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाढत चाललेला तणाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर तात्पुरता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ‘ यापूढे महायुतीतील दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते किंवा नेते आपल्या पक्षात घेऊ नयेत, अशा सूचना दोन्ही पक्षांनी पाळाव्यात असे स्पष्टपणे सांगितले.


यावादात आणखी भर म्हणून, फडणवीसांच्या इशार्‍यानंतर काही तासांतच शिंदे गटानेही भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करून ‘ जशास तसे ’ उत्तर दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कल्याण - डोबिवलीतीलराजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकंदरीत, महायुतीमध्ये सत्ता असली तरी स्थानिक राजकारणात दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. आणि फडणवीसांनी दिलेल्या ‘ तुम्हीच सुरुवात केली ’ या उत्तरामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.

Comments


bottom of page