top of page

कल्याण-डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का? बडा नेता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर

ree

कल्याण: कल्याण-डोंबिवली मापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातच कल्याण मधील काँग्रेस पक्षातील माजी नगरसेवक आणि नेता शिवसेना शिंदे गटात बुधवारी प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील अनेक दिवसांपासून हा गट शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गुप्त भेटीगाठी घेत असल्याची माहिती समोर आली होती. हवे तसे वजन मिळत नसल्याने हा प्रवेश रखडला होता मात्र अखेर आता हा गट शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे संकेत विश्वासनिय सूत्रांकडून मिळत आहेत.


महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने इतर पक्षांती तसेच आपल्या पक्षातील नाराज माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना आपल्या गोटात ओढण्याची जोरदार मोहिम राबवली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, काँग्रेसमधील नाराज गटाला देखील आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात काहीशी रस्सीखेच सुरू होती. डोंबिवली मधील काँग्रेसचे पदाधिकारी भाजपने गळाला लावले असतानाच शिवसेना शिंदे गटाने कल्याण मधील काँग्रेसच्या नेत्याला आपल्या जाळ्यात ओढले आहे.


दरम्यान, काँग्रेसमधील हा नेता गेल्या काही महिन्या पासून शिंदे गटातील आमदारांच्या संपर्कात होता. यानंतर नोव्हेंबर महिन्यात जिल्हाध्यक्ष पदाचा नाजीनाम देत या नेत्याने आपली नाराजी उघड केली होती. त्याचवेळी तो शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, शिंदे गटातील काही गणितं जुळत नसल्याने त्यांनी प्रवेश केला नसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यानच्या काळात ते अन्य पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना कल्याण डोंबिवली पालिका प्रचार प्रमुख पद देऊ केले. मात्र, सोमवारी या नेत्याने पक्षातील सदस्य पदाचा आणि प्रचार प्रमुख पदाचा राजीनाम वरिष्ठांकडे दिला आहे. यानंतर या चर्चांना अधिक उधाण आले आहे.


बुधवारी शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. या गटासह इतर काही माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने या वृत्ताला दुजोरा देखील दिला आहे.


कल्याण- डोंबिवली महापालिकेत अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेला आणि महापालिकेतील गोल्डन गँग मधील प्रचलित नेता गेल्या काही वर्षापासून शहर काँग्रेसचे नेतृत्व करत होता. काँग्रेसमधील खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.


विशेष बाब म्हणजे, हा गट भाजपमध्ये दाखल व्हावा यासाठी भाजपेच वरिष्ठ नेतेही मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील होते. विविध अश्वासनांद्वारे या गटाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अखेर बाजी शिवसेना शिंदे गटाने मारल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट या पक्ष प्रवेशाची तयारी करत असताना दुसरीकडे भाजपा देखील बुधवारी काही पक्ष प्रवेशाची तयारी करत आहे. शिंदे गटात हवे तसे वजन काँग्रेसच्या गटाला मिळत नसल्याने हा काँग्रेसचा गट हातचा राखून होता. शिंदे गटातील वजन वाढण्यासाठी काँग्रेस पक्षातून काही घडामोडी घडवून आणत या गटाने शिंदे सेनेतील अपल्या पारड्यात चांगली जागा मिळवून घेतल्याचे बोलले जात आहे.

Comments


bottom of page