काँग्रसने जिंकलेला एकमेव गड : लातूरच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी अॅड. स्नेहल उटगे
- Navnath Yewale
- 4 hours ago
- 2 min read

लातूर: राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर महापालिकेचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलं असून आता महापौर आणि
उपमहापौर कोण होणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर बहुमताच्या जोरावर काँग्रेसच महापौर पदासाठी दावेदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार काँग्रेसकडून लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी अॅड. स्नेहल उटगे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. दोन्ही पदांसाठी इतर कोणतेही दावेदार नसल्याने निकाल स्पष्ट झाला असून, लवकरच दोघेही अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत.
लातूर महानगरपालिकेतील 18 प्रभागांमधीलील 70 जागांपैकी काँग्रेस पक्षाने 43 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वंचित बहुजन आघाडीने 4 जागांवर यश मिळवले असून , काँग्रस- वंचित आघाडीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. येथील महापालिकेत भारतीय जनता पक्षाला 22 जागांवर समाधान मानावे लागेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवारगट ) केवळ एकाच जागेवर विजयी ठरला आहे.त्यामुळे भाजप विरोधी बाकावर बसणार आहे. दरम्यान, लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे येथील महापालिकेत महिला महापौर असणार आहे.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे आणि अॅड. स्नेहल उटगे यांचीच नावे समोर आल्याने या निवडी औपचारिक ठरल्या आहेत. निकाल स्पष्ट होताच लातूर महानागरपालिकेच्या प्रांगणात काँग्रेस पक्षाच्या वतीन विजय जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. महिला सुरक्षितता, शहरांमधील स्वच्छता आणि शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्हीची सोय योग्य पद्धतीने करण्याचे प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी दिली.
तर, रस्ते पाणी आणि कचरा या शहराच्या मूलभूत समस्या आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी योग्य रोड मॅप तयार करण्यात येईल निसर्गानं भरभरुन पाणी दिलं आहे मात्र पाणीपुरवठा उशीरा होतोय. त्याचं सुसूत्रीकरण करून लातूकरांना योग्य आणि मुबलक पाणीपुरवठा कसा करता येईल याबाबत आम्ही काम करणार आहोत, असं उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे निवडीनंतर बोलताना म्हणाल्या. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी लातूरमधील सभेतून दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसून जातील, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात लातूर महानगरपालिकेची निवडणूक गाजली. तसेच, येथील महापालिकेत कोणाची सत्ता येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, काँग्रेसने लातूरचा गड राखला असून 43 जगांसह स्पष्ट बहुमत मिळवलं आहे.



Comments