top of page

कोकाटेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याच्या अडणी वाढणार ! आदिवासी मंत्र्यावरच आदिवासींची जमीन हडप केल्याचा गंभीर आरोप

ree

नागपूर: बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्यावर एका स्थानिक वकील आणि समाजिक कार्यकर्त्याने ‘भूमाफिया’ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आदिवासी समुदायाच्या जमिनी हडप केल्याच्या आणि न्यायाच्या मुद्यावरून मंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मंत्री अशोक उईके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


यवतमात्र जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणार्‍या अ‍ॅड. सीमा तेलंगे (लोखंडे) यांनी नागपूर प्रेस क्लब मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री उईके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उईके हे ‘ भूमाफिया’ असून त्यांनी राळेगाव तालुक्यात आदिवासी समाजाची पहिली सूतगिरणी स्थापन करण्यासाठी आदिवासी समाजबांधवांचीच जमीन जबरदस्तीने हडप केल्याचा आरोप केला आहे. राळेगाव तालुक्यातील दवेधरी येथील भूरबा कोवे हा शेतकरी 1951 पासून कुळानुसार वहिती करत असलेली जमीन लाटण्याचा आरोप अ‍ॅड. तेलंगे यांनी केला. या कुटुंबाला जमिनीवरील हक्क सोडण्यासाठी आजही धमक्या दिल्या जात असल्याचे तेलंगे यांनी सांगितले. जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री असताना आदिवासीबहूल यवतमाळ जिल्ह्यातीलच आदिवासी समुदाय आजही विकासापासून आणि न्यायापासून कोसो दूर असल्याचे तेलंगे यांनी म्हटले आहे.


आदिवासी विकास मंत्री म्हणून उईके यांच्या कार्यकाळत आदिवासींवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यातील आदिवसींच्या आश्रमशाळांमध्ये शिकणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. तेलंगे यांनी केला आहे.

दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मुख्यमंत्र्यांकडून विशेषाधिकार वापरून मुलगी अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांना मुंबई उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती मिळवून दिली, असा गंभीर आरोप अ‍ॅड. तेलंगे यांनी केला. मंत्री उइके यांच्या या स्वार्थी वृत्तीचा निषेध करण्यासाठी नागपूर येथे संविधान चौकात आदिवासी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते, याकडेही अ‍ॅड. सीमा तेलंगे यांनी लक्ष वेधले. मुलगी सरकारी नोकरीत रूजू झाल्यानंतर लगेचच मंत्री अशोक उइके यांनी अनेक कार्यकर्त्यांना डावलून अ‍ॅड. प्रियदर्शनी यांना यवतमाळ नगराध्यक्षपदाची भाजपची उमेदवारी दिली, असे तेलंगे म्हणाल्या.


‘ सूतगिरणीच्या जमिनीचे ते प्रकरण न्यायाप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. तेलंगे स्वत: वकील असूनही त्यांना या गोष्टी कळत नसेल तर कठीण आहे. अ‍ॅड.तेलंगे यांच्या आरोपांवर मी उत्तर द्यावे इतक्या त्या मोठ्या नाहीत. त्यांचा बोलविता धनी राळेगाव मतदारसंघातील एक माजी मंत्री असल्याचा आरोप मंत्री उइके यांनी केला आहे.

Comments


bottom of page