घोलवडचे सरपंच रवींद्र बुजड यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
- Navnath Yewale
- Sep 18
- 1 min read
‘कन्या अरोग्य केंद्र’ उपक्रमाचे दिल्ली कार्यशाळेत कौतुक

डहाणु : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र वसंत बुजड यांनी गावाच्या विकासासाठी दाखविलेल्या दूरदृष्टीची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. नुकतेच दिल्ली येथे क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे आयोजित ‘सरपंच संवाद’ या राष्ट्रीय कार्यशाळेत त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
१४ ते १५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पार पडलेल्या या कार्यशाळेत सरपंच बुजड यांनी बोर्डी शाळेत मुलींसाठी सुरू केलेल्या ‘कन्या आरोग्य केंद्र’ या अभिनव उपक्रमाची माहिती सादर केली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या आरोग्य समस्यांवर तोडगा म्हणून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मुलींच्या आरोग्यदायी जीवनाला नवे बळ मिळाले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सत्रात देशाचे जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील उपस्थित होते. त्यांनी सरपंच बुजड यांचे सादरीकरण बारकाईने ऐकले व आपल्या भाषणात या उपक्रमाचा विशेष उल्लेख करत कौतुकाची थाप दिली. “ग्रामपंचायत स्तरावर असा संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम राबविणे हे निश्चितच प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या मान्यतेमुळे घोलवड ग्रामपंचायतीचा लौकिक देशभर पसरला असून गावकऱ्यांनी आपल्या सरपंचांचा अभिमान व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, “गावाच्या विकासासाठी उचललेले हे पाऊल केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श ठरेल.”



Comments