जनसुरक्षा विधेकाविरोधात निर्धार आंदोलन
अन्यायकारक जनसुरक्षा विधेयक रद्द करा; डहाणू सागर नाक्यावर उसळला जनसागर

कासा : महाराष्ट्रातील भाजपा-महायुती सरकारने बहुमताच्या जोरावर पारित केलेले जनसुरक्षा विधेयक 2024 हे लोकशाहीच्या मूल्यांना तिलांजली देणारे असून, नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. या विधेयकाच्या विरोधात बुधवार, दि. 10 सप्टेंबर 2025 रोजी राज्यभर निर्धार आंदोलन उभारण्यात आले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित या आंदोलनात डहाणू सागर नाक्यावर हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. “जनविरोधी, घटनाविरोधी, लोकशाही हक्क नाकारणारे जनसुरक्षा विधेयक रद्द करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सभागृहात पारित होताना विरोधकांकडून कडाडून विरोध होऊनही हे विधेयक बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले. त्यामुळे लोकशाही मार्गाने व शांततेने आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दडपशाही करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

या निदर्शनावेळी आमदार कॉ. विनोद निकोले, ब्रायन लोबो (कष्टकरी संघटना), भरत वायेडा (भूमी सेना), मा. जि.प. सदस्य काशीनाथ चौधरी (UBT शिवसेना), मा. जि.प.स. जयेद्र दुबळा, कॉ. चंद्रकांत गोरखाना, कॉ. रडका कलांगडा यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले. सर्वांनी एकत्रितपणे या जुलमी विधेयकाचा तीव्र निषेध नोंदवला.
“हे जनसुरक्षा नव्हे तर असुरक्षा विधेयक आहे. लोकशाही हक्कांची पायमल्ली करणाऱ्या या काळ्या कायद्याविरोधात आमचा लढा कायम राहील.”
आमदार कॉ. विनोद निकोले, C.P.M.



Comments