जरांगे पाटील यांचा सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा जंतरमंतरवर आंदोलनस्थळी भेट; अभिजीत दिपकेंचे कौतुक
- Navnath Yewale
- 2 days ago
- 2 min read

नवी दिल्ली: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बुधवारी (दि.22) नवी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतिने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देवून पाठिंबा जाहीर केला. जरांगे पाटील यांनी अभिजीत दिपके यांचं कौतुक करत त्यांना आंदोलनासाठी कानमंत्र दिला. तुम्ही ही जागा सोडू नका, अन्यथा सरकार तुमचं आंदोलन चिरडून टाकेल, असं जरांगे पाटील म्हणाले. तसंच यापुढेही सरकारने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यास आम्ही सर्वजण तुमच्यासोबत लढू, असा विश्वासही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.
जंतरमंतरवर सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना जरांगे पाटील म्हणाले की, “ आम्ही आंतरवाली सराटी इथं गोरगरिबांच्या लेकरांसाठी आंदोलन केलं. तेव्हाही यांच्या सरकारने लहान मुलं, महिलांवर लाठीचार्ज केला. या सरकारने आमच्यावरही गोळ्या घातल्या होत्या. माझी सगळ्या विद्यार्थ्याना विनंती आहे की, तुम्ही ही जगा सोडून नका. पूर्ण देश तुमच्या सोबत आहे. तुम्ही इकडं-तिकडं गेला तर हे लोक आंदोलन मोडून टाकतील. शांततेच्या आंदोलनात प्रचंड ताकद आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आहे. आम्ही ही तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास जरांगे यांनी उपस्थितांना दिला.
दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली, “ देशातील भाजप सरकार वारंवार गोरगरिबांच्या लेकरांवर अन्याय करत आहे. यापुढील काळात जर पुन्हा सरकारने अशा प्रकारचा हल्ला विद्यार्थ्यांवर करण्याचा प्रयत्न केला तर या नेत्यांचं महाराष्ट्रात फिरणं पूर्ण बंद होणार. यांचा माज उतवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.
“ सरकारला आपण निवडणून दिलं आहे, आपल्या मायबापाने यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि गावातील लोकांनी यांना मतदान केलं आहे. पण हेच लोक आता आपल्यावर उठले आहेत. यांना उलटं करण्याची ताकद या देशातील विद्यार्थ्यांमध्ये आहे. लोकांमध्ये आहे. पण ही गोष्ट यांच्या लक्षात येत नाही. यापुढील काळात तुम्हाला धक्का लागला तर आम्ही तुमच्या सगळ्यांसोबत आहोत, अभिजीत भैय्यांसोबत आहोत, एवढाच शब्द मी तुम्हाला देतो” असं म्हणत जरांगे पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
तत्पूर्वी आंदोलनकर्त्यांनी जरांगे पाटील यांना हिंदीतून बोलण्याची विनंती केली होती. मात्र माझी हिंदी ऐकल्यावर तुम्हाला जी हिंदी येते, तीही तुम्ही वियरून जाल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी जरांगे पाटील यांनी मराठीत केलेल्या भाषणाचा सार हिंदीतून सांगत जरांगे पाटील आपल्या सोबत असल्याचा विश्वास आंदोलकर्त्यां तरुणांन दिला.



Comments