जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला एकटं पाडण्याची रणनिती दोन्ही शिवसेना एकत्र येणार, धाराशिवच्या नेत्यांमध्ये खलबतं
- Navnath Yewale
- Jan 18
- 1 min read

धाराशिव: राज्यात महानरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत 29 महापालिकांपैकी बहसंख्य महापालिकांत भाजपा हा क्रमांक एक नंबरचा पक्ष ठरला आहे. आता राज्यभरात महापौरपदाच्या निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे महानगरपालिकेची निवडणुक संपलेली असताना आता दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद जिंकण्यासाठी आतापासूनच युती आणि आघाड्यांच्या राजकारणाने वेग पकडला आहे. असे असतानाच आता खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे.
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी या एकत्रिकरणासाठी चर्चा चालू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यामध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर सोमवारी (19 जानेवारी) दोन्ही शिवेसेनच्या नेत्यांची आणि पदाधिकार्यांची धाराशीव येथे संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आज 18 जानेवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या अनुषंगानेच धाराशिव येथे पदाधिकार्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांचे मत जाणून घेण्यात येणार आहे. एकंदरीतच आमदार तानाजी सावंंत, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला एकटे पाडण्याच्या हालचाली सुरू केल्याचे धाराशिवमध्ये पाहावयास मिळत आहे.
राज्यात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणुक लढवली आहे. असे असतानाच आता धाराशीवमध्ये एकत्रिकरणाच्या प्रयोगाची चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



Comments