top of page

टॅक्सचा झोल? : पवारांच्या अडचणी वाढल्या!,पार्थ पवाराच्या कंपनीपाठोपाठ ;‘जिजाई’ बंगलाही वादात


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीच्या व्यवहारामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून अनेक अधिकार्‍यांना गुरूवारी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचे कंपनीमधील भागिदार दिग्विजय पाटील, शितल तेजवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच सदर 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याच्या गोंधळाबरोबरच इतरही अनेक आक्षेप घेतले जात आहे. असाच एक आक्षेप आता वादात सापडलेल्या अमेडिया कंपनीच्या नोंदणी केलेल्या पत्त्यावरून घेतला जात आहे.


जिजाई बंगला वादाच्या भोवर्‍यात :

पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये महार वतनाची 40 एकर जमीन गैरव्यवहाराच्या माध्यमातून 300 कोटी रुपयांना खरेदी केली. या व्यवहारासाठी 21 कोटी मुद्रांकन शुल्काऐवजी केवळ 500 रुपये भरण्यात आले. या कंपनीची नोंदणी जिजाऊ बंगल्याच्या पत्त्यावर झाली असून अमेडिया होलडिंग कंपनीचा पत्ता सर्व्हे नंबर 132, बी 21 यशवंत घाडगे नगर, शिवाजीनगर पुणे- 411005 असा आहे. हा पत्ता जिजाई बंगल्याचा आहे. त्यामुळेच आता पार्थ पवारांचा जिजाई बंगला वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे.


बंगल्याच्या करारावरून वाद : मुंढव्यातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा पत्ता जिजाई बंगल्याचा आहे. मात्र हा बंगला निवासी भागात आहे. त्यामुळे या बंगल्यात कंपनीचे कार्यलय कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीचे कार्यालय निवासी बंगल्यात सुरू केले असल्यास त्यांनी महापालिकेला मिळकत कर व्यवसायिक दराने भरला आहे का? याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. जिजाई बंगला निवासी असल्याने त्याचा मिक़त कर निवासी दराने भरला जात असल्याची माहिती आहे. मात्र या बंगल्यात कंपनीचे कार्यालय दाखवले गेले असल्याने त्यासाठी महापालिकेला नियमानुसार व्यवसायिक दराने मिळकत कर भरणे आवश्यक आहे. वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणानंतर पार्थ पवारांच्या कंपनीचा पत्त्यावरूनही आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


अजित पवार संतापले म्हणाले : “ कंपनीचा जो पत्ता आहे तो आपल्या घराचा पत्ता असल्याचं कळतय” असं म्हणत अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. इतक्यात दुसर्‍याने, ‘21 कोटी रुपये...’ असं म्हणत पुढचा प्रश्न विचाण्याचा प्रयत्न केला. मात्र अजित पवारांनी पहिल्याच प्रश्नावर उत्तर देताना पत्रकाराला, “ अरे बाबा ऐक ना! तुलाच फार कळतं का? मी स्वत:हून आले ना?” असा सवाल संतापून विचारला. “ कानावर आल्यावर मी एवढच सांगितलं की, कुठल्याही चुकीच्या गोष्टी करू नका. एवढं तर मी सांगणार ना?” असा सवाल अजित पवारांनी विचारला. “ त्या पद्धतीने मी सांगितलं आहे. पण आता तुुम्ही जे काही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काही म्हणताय. त्याची शहानिशा करतो ना,” असंही अजित पवार संतापून म्हणाले.

Comments


bottom of page