ट्रम्प यांच्या धमकीला झुगारून, भारताची रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार
- Navnath Yewale
- Aug 3
- 2 min read
रिपोर्टमध्ये मोठा दावा, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादताना रशियाकडून तेल आणि अस्त्र खरेदी करत असल्यानं दंडाचा इशारा दिला होता.

भारत सरकारनं देशातील रिफायनरी कंपन्यांना रशियाकडून तेल खरेदी न करण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही. एका इंग्रजी वृत्तपत्रामधून हा दावा करण्यात आला आहे. सध्या भारत अमेरिकेच्या धमकी आणि आपल्या गरजांच्या नुसार निर्णय घेण्याबाबत विचार करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी मीडियासोबत बोलताना भारत जर रशियाकडून तेल खरेदी करणार नसेल तर चांगलं पाऊल असल्याचं म्हटलं होतं.
शनिवारी न्यायॉर्क टाइम्सनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की ट्रम्प यांच्या दंडाच्या धमकी नंतर देखील भारतानं रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवली जाईल. मात्र, भारत सरकारकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सरकारी आणि खासगी तेल कंपन्यांना त्यांच्या पसंतीच्या विक्रेत्यांकडून तेल खरेदी करण्याची परवानगी असेल, हा त्यांचा व्यापारी निर्णय असेल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर 25 टक्के टॅरिफ
गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि रशियाकउून शस्त्र आणि तेल खरेदी करत असल्यानं दंड देखील लादला होता. रशियासोबत भारतानं मैत्री कायम ठेवल्यानं हा दंड आकारण्यात आला होता. ब्लुमबर्गच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात रिफायनरी कंपन्यांना रशियाच्या पर्यायांबाबत प्लॅन तयार ठेवण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार कंपन्यांना विचारण्यात आलं रशियाचा पर्याय म्हणून कोण कोणते देश तेल खरेदीसाठी पर्याय ठरू शकतात. भारतानं रशियाकडून तेल खरेदी केमी केल्यास पुन्हा एकदा आखाती देशांवरील अवलंबित्व वाढेल. त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला यूक्रेन सोबत सुरु असलेलं युद्ध थांबवण्याचा इशारा दिलेला आहे. रशियानं येत्या काही दिवसांमध्ये युद्ध न थांबवल्यास त्यांच्यासोबत व्यापार करणार्या देशांना दुय्यम टॅरिफ द्यावं लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प रशिया आणि यूक्रेन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांचा प्रयत्न आहे. त्यामुळं रशियाकउून क्रूड ऑईलची विक्री जात आहे. चीन आणि भारत हे दोन देश रशियाच्या क्रूड ऑईलचे प्रमुख खरेदीदार आहेत. त्यामुळं रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी ट्रम्प भारताला इशारा देत आहेत. दरम्यान, भारत आणि रशिया गेल्या अनेक दशकांपासून मित्र राहिलेले आहेत. आता ट्रम्प यांच्या इशार्यांनंतर भारत काय भूमिका घेतोय हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Comments