top of page

ठाकरे बंधूच्या आधी काँग्रसने डाव साधला; काँग्रेस- वंचितची हातमिळवणी?,बीएमसीत तिहेरी लढतीचे संकेत

मुंबई: महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आता मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र लढण्याचे संकेत दिल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर काँग्रेसचे मुंबई प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या एका वरिष्ठ शिष्टमंडळाने आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


धर्मनिरपेक्ष मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. ठाकरे आणि मनसे एकत्र आल्याने काँग्रेसने आता सेक्युलर आणि वंचित मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार असली, तरी वंचित बहुजन आघाडीसारख्या समविचारी पक्षांशी जगावाटपाची चर्चा करून महायुती आणि ठाकरे- मनसे जोडीसमोर तगडे आव्हान उभे करण्याची काँग्रेसची व्यूहरचना आहे. या भेटीत केवळ जागावाटपावरच नाही, तर मुंबईतील प्रदूषण, नागरी सुविधा आणि महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावर यासह स्थानिक प्रश्नां हात घालण्याच्या मुद्यांवर ही चर्चा झाल्याची माहिती आहे.


शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र आल्याने मराठी मतांचे धु्रवीकरण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी काँग्रेसने मुंबईतील आपला पारंपारिक मतदार टिकवून ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांशी संधान साधले आहे. ‘ आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन विकास आणि सर्वसमावेशकतेच्या मुद्यावर ही निवडणुक लढवू’ असे सूचक विधान वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

मुंबईत काँग्रेसला डावलून ठाकरे बंधू एकत्र आल्याने काँग्रेसने ‘ वंचित ’ चा हात धरून आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. यामुळे ही निवडणुक आता सत्तेची नाही, तर अस्तित्वाची लढाई बनली आहे. महायुती म्हणजेच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती, ठाकरे आघाडी म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी आणि तिसरी काँग्रेस- वंचित आघाडी (अल्पसंख्यांक मतेही) अशी मुंबईत तिहेरी लढत होण्याची दाट शक्यता सध्याच्या राजकीय हालचालिंवरून दिसून येत आहे.

Comments


bottom of page